नवी मुंबई : असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नवी मुबईकरांची शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने संपूर्ण शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले. तासाभराच्या या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळायले.अचानक आलेल्या या पावसामुळे सीबीडी, वाशी, सानपाडा येथील रस्त्यांवर गाड्या घसरल्याचे दिसून आले. शहरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नसल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. वादळी वाऱ्यासोबत आलेल्या या पावसाच्या सरींमुळे शहरातील बेलापूर, जुईनगर, वाशी या परिसरात झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना आढळून आल्या. शालेय विद्यार्थ्यांच्या तसेच महाविद्यालयांच्या सुरू असलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना भिजतच परीक्षेला जावे लागले, तर काहींनी मात्र खासगी वाहनांचा आधार घेतला. अचानक आलेल्या या जोरदार सरींमुळे नागरिकांनी रस्त्यावरील आडोशाचे ठिकाण शोधले. या अवकाळी पावसामुळे शहराच्या हवामानात बदल झाला असून, प्रकृतीच्या समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेलापूर मध्ये १.६ मि.मी., नेरूळमध्ये १.३ मि.मी., वाशीत २.६ मि.मी. तर ऐरोलीत ३.० मि.मी. अशा एकूण २.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
वादळी वाऱ्यासह शहरात अवकाळी पावसाची हजेरी
By admin | Updated: March 5, 2016 02:17 IST