नवी मुंबई : महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे येथील कृष्णा कोलते याने महापौर केसरीचा बहुमान पटकावला. त्याला मानाची गदा व एक लाख रूपये बक्षीस देवून गौरविण्यात आले. पुणे येथीलच सागर मोहोळ याने उपविजेतेपद पटकाविले. कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानामध्ये आयोजित स्पर्धेमध्ये महापौर केसरीचा बहुमान कोण पटकाविणार याकडे कुस्तीशौकिनांचे लक्ष लागून राहिले होते. पुणे शहराचा कृष्णा कोलते व सागर मोहोळ यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. कोलतेने दहा गुणांच्या फरकाने मोहोळचा पराभव केला. विजयाची घोषणा होताच त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते एक लाख रूपये व गदा देवून त्याचा गौरव करण्यात आला. पुण्यामधील सागर मोहोळ, ठाण्यामधील दीपक पाटील व औरंगाबादमधील मनीष वर्मा यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चौथा क्रमांक मिळविला. कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, खजिनदार सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेला सुरवात झाली होती. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, क्रीडा समिती सभापती प्रकाश मोरे, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेविका लता मढवी, उपआयुक्त दादासाहेब चाबूकस्वार, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणच्या १५६ मल्लांनी सहभाग घेतला होता. त्यानुसार पाच वयोगटात कुस्तीचे हे सामने खेळण्यात आले. गत काही वर्षात कुस्ती खेळालाही ठिकठिकाणी प्राधान्य मिळू लागल्याने पालिकेच्या वतीने आयोजित मॅटवरील कुस्तीचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर महापौर चषक कुस्ती स्पर्धेत यंदा प्रथमच महाराष्ट्र केसरी लढणाऱ्या मल्लांनीही मोठ्या संख्येने उत्सुकता दर्शवली. ठाणे - रायगड जिल्हा (६१ ते ७० किलो)प्रथम : लखन म्हात्रे (कल्याण)द्वितीय : भरत हरगुळे (नवी मुंबई)तृतीय : वैभव माने (भार्इंदर)
कृष्णा कोलते बनला महापौर केसरीचा मानकरी
By admin | Updated: February 29, 2016 02:12 IST