पनवेल : कामोठे सेक्टर १८ मधील यश गार्डन इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील रूम नंबर ४0१ मध्ये शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घरातील इलेक्ट्रिकल बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वेळी घरात तीन व्यक्ती होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे.सकाळी कृष्ण नंदन सिंग हे घरात टीव्ही पाहत होते. टीव्ही लावल्यानंतर काही वेळातच टीव्हीजवळील बोर्डात शॉर्टसर्किटमुळे टीव्ही केबलला आग लागली. त्यामुळे टीव्ही, डायनिंग टेबल खाक झाले. त्यानंतर ही आग पूर्ण घरभर पसरली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहचले. यातील पोलीस कर्मचारी आर.बी.जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे व अन्य कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी किचनमधील दोन सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी हानी टळली. (प्रतिनिधी)
शॉर्टसर्किटमुळे कामोठेत घराला आग
By admin | Updated: November 14, 2015 02:25 IST