कर्जत/नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील कळंब पुलालगत मुरबाडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास एका दुचाकीला धडक दिली होती. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता, मात्र स्थानिक पातळीवर वेळेवर उपचार न मिळाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य जखमी तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला अटक करण्याच्या मागणीसाठी दोन दिवस कळंब ग्रामस्थांनी मोर्चे काढले. दरम्यान, पोलीस आणि सरकारी दवाखाना हे हलगर्जी करीत असल्याबद्दल कळंबमधील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अपघातात वारे येथून कळंब येथे घरी परतणारे दोन मुस्लीम तरु ण ट्रकची धडक लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यात १८ वर्षीय तरु ण जियान रौफ डोंगरे आणि त्याचा मित्र आमन अकबर खान (रा. कळंब) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार वेळेवर झाले नाहीत त्यामुळे त्या दोघांना बदलापूर येथील एका खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेत असताना त्यातील जियान रौफ डोंगरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे होत असताना स्थानिक ग्रामस्थांनी धावपळ करीत अपघात करून पळून जात असलेला ट्रक कशेळे येथे पकडला. पोलीस तेथे पोहचले, त्यावेळी अपघात करणाऱ्या ट्रकच्या चालकाने मद्यपान केलेले असताना आणि तशी माहिती पोलिसांना देऊन देखील पोलिसांनी त्या चालकाची वैद्यकीय तपासणी केली नाही. तसेच ट्रक चालक तसेच मालक यांना स्थानिक लोकांची मागणी असताना हजर केले नाही. त्यामुळे संतापलेल्या कळंब ग्रामस्थांनी एकत्र येवून कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आपला मोर्चा वळविला. (वार्ताहर)> जियान दुचाकी क्र मांक एमएच ०५ एके ४९६९ वरून घरी येत होता. त्यावेळी मुरबाडवरून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्र मांक एमएच १२ डीएच ७२ चालक मजिद अन्सारी मोहम्मद हुसेन अन्सारी (३५) हा आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव व बेधडक दारूचे सेवन करून चालवित असताना कळंब गावाजवळ आला असताना दुचाकीला जोरात धडक देऊन अपघात करून पळून गेला होता.