नवी मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी हा वाद थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर पक्षातील अंतर्गत वाद मिटल्याचा निर्वाळा पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आला.शिवसेनेत सरळ दोन गट पडल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून निर्माण झाले आहे. शुक्रवारी महासभेत महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना ही बाब प्रकर्षाने समोर आली होती. सभापती शिवराम पाटील यांनी या वेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा नामोल्लेख टाळून विरोधकांचा गवगवा केला होता. दुसऱ्या दिवशी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सोमवारी दोन्ही गटातील ३७ नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटांतील नगरसेवकांना चांगलीच समज दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिवसेनेतील अंतर्गत वाद मातोश्रीवर
By admin | Updated: March 21, 2017 02:14 IST