डोंबिवली : बांधकामाचे नियम धाब्यावर बसवून उभारलेल्या आयरे येथील बालाजी गार्डन टॉवरला परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्त मधुकर अर्दड यांना दिले आहेत. रस्ता नसताना तो असल्याचे भासवून नियमबाहय पध्दतीने बांधकाम मंजूरी मिळविल्याचे बालाजी गार्डन प्रकरणात २०१० मध्ये उघड झाले. याप्रकरणातील वास्तूविशारद तसेच विकासक यांच्यावर ठोस कारवाई व्हावी असा ठराव तत्कालीन स्थायी समिती आणि महासभेने केला होता. त्यानुसार विकासकावर एमआरटीपी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई झाली तर वास्तूविशारदाला काळया यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान काही भूधारकांच्या जमिनी दाखवून बांधकाम परवानग्या मिळविल्याचा प्रकार यात घडला होता. याप्रकरणी भूधारक दशरथ पाटील यांनी या अनियमिततेची तक्रार २०१० मध्येच नगरविकास विभागाकडे केली होती. त्यांच्या मालकीचे ५ हजार चौ.मी जागेचे क्षेत्र दिलेल्या बांधकाम मंजूरीमधून वगळण्यात यावे, सीआरझेड मधील बांधकाम तोडण्यात यावे आणि संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या मालकीच्या जागेबरोबरच गावदेवी देवस्थान आणि अन्य तिघांच्या जागेचे क्षेत्रफळ दाखवून चटई क्षेत्र (एफएसआय) वापरले असून यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने चार परवानग्या मिळविल्याचा त्यांचा आरोप आहे. एकत्रित जागेचा सर्व्हे अद्यापही झालेला नाही अन्यथा या अनियमिततेचा भांडाफोड झाला असता असे त्यांचे म्हणणे आहे. बालाजी टॉवरमध्ये एकूण ८ इमारती आहेत़ यातील काही इमारतींना अद्यापपर्यंत वापर परवाना मिळालेला नाही तसेच यातील तीन इमारती अनधिकृत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या प्रकरणात विकासक आणि वास्तूविशारदांने अवैधरित्या परवानग्या मिळविल्याचे उघड झाले असले तरी कागदपत्रांची शहनिशा न करता बांधकामाला परवानगी देणारे पालिकेच्या नगररचना विभागातील तत्कालीन अधिकारीदेखील तितकेच दोषी आहेत. चौकशीचे आदेश देताना तक्रारदाराच्या जागेचे क्षेत्र वगळून सुधारीत बांधकाम परवानगी देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही नगरविकास विभागाने नमूद केले आहे. यात ठोस कारवाई झाली नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बालाजी गार्डनप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा
By admin | Updated: February 17, 2015 22:58 IST