एनएमएमटीच्या तोट्यात होतेय वाढ, महिन्याला साडेतीन कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:10 AM2017-10-26T02:10:33+5:302017-10-26T02:10:44+5:30
नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ७८ पैकी फक्त ३ मार्ग पूर्णपणे नफ्यामध्ये आहेत. ८ मार्ग ना नफा ना तोट्यावर सुरू असून, उर्वरित ६७ मार्ग तोट्यात सुरू आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याला साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. परिवहन उपक्रमाने तोटा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु जोपर्यंत शासनाकडून तिकीट दरवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नाही तोपर्यंत तोट्याचे प्रमाण कमी करणे शक्य होणार नाही.
एनएमएमटी उपक्रमाच्यावतीने सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई, मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात ७८ मार्गांवर सेवा दिली जात आहे. यामधील मनपा क्षेत्रामध्ये ११ मार्ग आहेत. मनपाच्या हद्दीत सुरू होऊन शहराबाहेर जाणारे ४७ मार्ग असून पूर्णपणे मनपा क्षेत्राबाहेर २० मार्ग आहेत. उपक्रमाचे घणसोली, तुर्भे व आसुडगाव असे ३ आगार असून जवळपास १६ डेपो आहेत. उपक्रमाकडे एकूण ४७६ बसेस आहेत. यामध्ये डिझेलवर चालणाºया २४४, सीएनजीवरील १५०, वातानुकूलित व्होल्वो ८० व २ हायब्रीड बसेसचा समावेश आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे उपक्रमाच्या बसेस वर्षाला २५ लाख ५८ हजार किलोमीटर धावत आहेत. प्रचलित तिकीट दराप्रमाणे एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षामध्ये उपक्रमाला प्रत्येक महिन्याला सरासरी ९ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात खर्च १३ कोटी ३५ लाख रुपये झाला असून प्रत्येक महिन्याला जवळपास साडेतीन कोटी रुपये तोटा होऊ लागला आहे. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक किलोमीटरला ३९ रुपये उत्पन्न होत असून खर्च ५३ रुपये होत आहे. प्रत्येक किलोमीटरला १४ रुपये तोटा होत असल्याची माहिती प्रशासनाने सर्वसाधारण सभेमध्ये दिली आहे.
परिवहन उपक्रम तोट्यामध्ये जाण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये इंधन दरामध्ये सातत्याने होणारी वाढही कारणीभूत आहे. एक वर्षापूर्वी डिझेलचे दर ५० रुपये होते ते आता जवळपास सरासरी ६२ रुपयांवर गेले आहेत.
दोन वर्षांमध्ये तिकीट दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे तोटा वाढू लागला आहे. परिवहन उपक्रमाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करून तो अंतिम मंजुरीसाठी परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असून त्यानंतर तोटा कमी करण्यात यश येऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पूर्वीपेक्षा जाहिरातीच्या उत्पन्नामध्येही वाढ करण्यात आली असून भविष्यात महत्त्वाच्या डेपोंचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढ केली जाणार आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने प्रयत्न केला तर उपक्रमाचा तोटा भरून काढणे शक्य होईल, असेही मत व्यक्त केले जात आहे.
>दरवाढीकडे लक्ष
परिवहन उपक्रमाने तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन तिकीट दराची अंमलबजावणी झाल्यानंतर तोटा कमी होणे शक्य होणार आहे.
जाहिरातीमधून
उत्पन्न वाढले
महापालिकेच्या डेपो व बसथांब्यावरील जाहिरातीच्या माध्यमातून पूर्वी उपक्रमास १५ ते १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. प्रशासनाने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे ते उत्पन्न जवळपास ४२ लाखांवर गेले आहे. अशाचप्रकारे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
>वाशी डेपोचा विकास
उपक्रमाने महत्त्वाच्या डेपोंचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर वाशी डेपोचा विकास केला जाणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या माध्यमातून महिन्याला जवळपास अडीच कोटीरुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
> मनपा क्षेत्रातील बस मार्ग व प्रति किलोमीटर उत्पन्न
मार्गाचे नाव उत्पन्न
वाशी रेल्वे स्टेशन ते कोपरखैरणे रेल्वे स्टेशन २०.३५
रबाळे रेल्वे स्टेशन ते अल्फा लेवल ११.३६
घणसोली आगार / घरोंदा ते वाशी गाव ४३.३९
घणसोली आगार / घरोंदा ते सानपाडा रेल्वे स्थानक २३.७२
नेरूळ सेक्टर ४६ ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ २३.६६
कोपरखैरणे बस स्थानक ते सीबीडी बसस्थानक १८.१०
घणसोली आगार ते नेरूळ सेक्टर ४६ ३७.९२
घणसोली आगार ते आर्टिस्ट कॉलनी २१.२१
वाशी सेक्टर ७ ते सीबीडी बस स्थानक २४.६
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ते आर्टिस्ट कॉलनी १७.५९
नेरूळ रेल्वे स्थानक ते सीबीडी बस स्थानक २६.६७
> शहराबाहेरील कमी उत्पन्न असलेले बस मार्ग
मार्गाचे नाव उत्पन्न
वाशी रेल्वे स्थानक ते ठाणे मार्गे सानपाडा १०.२
नेरूळ सेक्टर ४६ ते ठाणे मार्गे सानपाडा १७.४३
सीबीडी बस स्थानक ते ठाणे मार्गे बेलापूर गाव १६.७५
नेरूळ सेक्टर ४६ ते दादर हिंदमाता मार्गे मोराज १६.७८
ऐरोली बस स्थानक ते मंत्रालय १६.४
> शहराबाहेरील जास्त उत्पन्न असलेले बस मार्ग
मार्गाचे नाव उत्पन्न
नेरूळ रेल्वे स्थानक ते बामनडोंगरी रेल्वे स्थानक ४८.४
घणसोली आगार ते पेठाली गाव फेज १ ३९.१०
ऐरोली बस स्थानक ते आगरकर चौक अंधेरी पूर्व ४४.३२
घणसोली घरोंदा ते वसंतराव नाईक चौक ४२.१
ऐरोली बस स्थानक ते बोरीवली पूर्व मार्गे ठाणे घोडबंदर ५२.४९
> शहराबाहेरील जास्त उत्पन्न असलेल्या बस
मार्गाचे नाव उत्पन्न
खारघर रेल्वे स्थानक ते खारघर सेक्टर २७ ४०.६७
खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा आरएएफ ५०.३८
पोलीस मुख्यालय कळंबोली ते मानसरोवर रेल्वे स्टेशन ४८.८४
पनवेल स्टेशन ते महालक्ष्मी नगर नेरे ४२.५९
खारघर जलवायू ते बोरीवली पूर्व ४०.१५
खारघर ओवे गाव ते बोरीवली पूर्व ४८.७४