नागरी वसाहतीत अवजड वाहनांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:22 AM2019-11-04T02:22:25+5:302019-11-04T02:23:40+5:30

अपघाताची शक्यता : दळणवळण यंत्रणेचा बोजवारा; महापालिकेसह वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

Heavy Vehicle Shipping in Civilian Colony navi mumbai | नागरी वसाहतीत अवजड वाहनांचा शिरकाव

नागरी वसाहतीत अवजड वाहनांचा शिरकाव

Next

नवी मुंबई : सुनियोजित शहराची बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई नगरीला अवैध पार्किंगचा विळखा पडला आहे. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत रस्त्यांवरही बेकायदा पार्किंगचे पेव फुटले आहेत. मोकळे रस्ते दुर्मीळ झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रवेश निषिद्ध असलेल्या अवजड वाहनांनीही आता नागरी वसाहतीतील रस्त्यांवर शिरकाव केला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. शहराचे नियोजन प्राधिकरण असलेल्या महापालिकेसह वाहतूक विभागाने या प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळेझाक केल्याने आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मागील दोन दशकांत नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. लोकसंख्येच्या वाढीबरोबर येथील उद्योगधंदेही वाढीस लागले. त्यानुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. शहर उभारताना पार्किंगचे सुयोग्य नियोजन झाले नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. रस्ते अपुरे पडू लागले आहेत. पार्किंगच्या सुविधा नसल्याने वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत आहेत. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत अरुंद रस्तेही आता वाहनांच्या पार्किंगला अपुरे पडू लागले आहेत. या रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने परिसरातील दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्यांवर दुतर्फा पार्क केल्या जाणाºया वाहनांमुळे दैनंदिन साफसफाईचा प्रश्नही उद्भवू लागला आहे. मागील २० वर्षांपासून टप्प्याटप्प्याने विस्तारित होणाºया या समस्येकडे येथील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनानेही या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. याचा परिणाम म्हणून आज या समस्येने आक्राळ स्वरूप धारण केले आहे. सुनियोजित शहराचा पुरता बोजवारा उडाला आहे.
मागील काही महिन्यांपासून नागरी वसाहतीतील अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांचा वावर दिसू लागला आहे. यात ट्रक, टँकर, मोठे ट्रेलर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्सच्या गाड्या आदीचा समावेश आहे. अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असतानाही नागरी वसाहतीतील रस्त्यांवर या गाड्यांच्या रांगा दिसून येताता. नागरी वसाहतीतील रस्त्यांवर अवजड वाहने पार्क केल्याने त्या परिसरातील दळणवळणाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. स्कूल बस आणि रुग्णवाहिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.

पार्किंग नसल्याने समस्या
तुर्भे येथील एपीएमसीची सर्वात मोठी बाजारपेठ, ट्रान्स हार्बर मार्गावरील अशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आणि जेएनपीटी बंदर आहे. तसेच सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूरमार्ग हे महत्त्वाचे रस्ते नवी मुंबईतून जातात. यातच मागील दोन दशकांत शहरात आयटी उद्योगाचे जाळे पसरले आहे. येथे नोकरी करणाºयांना गलेलठ्ठ पगार असल्याने वाहन ही गरजेपेक्षा हौसेची बाब बनली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नवी मुंबईत वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येते. त्या तुलनेत शहरात पार्किंगच्या सुविधा नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

एपीएमसीतील ट्रक शहरातील रस्त्यांवर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ तुर्भे येथे आहे. या बाजारपेठेत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपºयातून दरदिवशी कृषिमालाची शेकडो वाहने येतात.
या वाहनांच्या पार्किंगसाठी सेक्टर १९ येथे विस्तीर्ण ट्रक टर्मिनल बनविण्यात आले आहे; परंतु आता हे ट्रक टर्मिनलही अपुरे पडू लागले आहे. याचा परिणाम म्हणून एपीएमसी परिसरातील रस्त्यांवर ट्रक पार्क केले जात आहेत.
आता तर या अवजड वाहनांनी आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील रस्त्यांवर आपला विस्तार वाढविला आहे. या परिस्थितीला वेळीच निर्बंध घातले गेले नाहीत, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागतील, अशी भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
 

Web Title: Heavy Vehicle Shipping in Civilian Colony navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.