पनवेल : पनवेल शहर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची हमी घेतली असून, शहरातील सर्व ज्येष्ठांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जे वयोवृद्ध एकटे राहतात त्यांचे पालकत्वही पोलिसांनी स्वीकारले असून, त्यांची नियमित विचारपूस पनवेल शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रभात रंजन यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा पदभार घेतल्यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी, सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. नोकरी-व्यवसायानिमित्त मुले बाहेरगावी असल्याने किंवा दुरावल्याने अनेकदा ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. एकाकीपणामुळे ते मानसिक तणावाखाली असतात. त्यातूनच अनेकांना नैराश्य येते. हे नैराश्य घालविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी भूमिका प्रभात रंजन यांनी घेतली आहे. घरात वृद्ध मंडळी एकटी असल्याचे पाहून चोरी आणि त्यातूनच हत्येच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांना सुरक्षा पुरविण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पनवेल पोलिसांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित केली आहे. त्याचे अर्ज भरून घेऊन ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे. शहरात एकूण १६ ठिकाणी ज्येष्ठ एकटे राहत आहेत. त्याचे पालकत्व पोलिसांनी स्वीकारले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी या ठिकाणी जाऊन ज्येष्ठाची विचारपूस करण्याची जबाबदारी बीट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांनी स्वीकारले ज्येष्ठांचे पालकत्व
By admin | Updated: October 12, 2015 04:54 IST