नवी मुंबई : अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेला कंटाळलेल्या नवी मुंबईकरांना रविवारी पावसाचा आनंद लुटता आला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पहिल्याच आठवड्यात मान्सून बरसणार होता, मात्र हा अंदाज चुकीचा ठरवत आठवडाभर उशिराने मान्सून शहरात दाखल झाला. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा मात्र चांगला पाऊस व्हावा याकरिता नागरिकांनी साकडे घातले आहे.सुटीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने लहान - मोठ्यांनी या पावसाचा आनंद लुटला तर काहींनी घरात बसून या पावसाच्या वातावरणाचा सुखद अनुभव घेतला. रस्त्यावरील चहाच्या टपऱ्या तसेच भजीच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. पनवेल परिसरातही आज दुपारापसून पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजेनंतर मात्र पावसाने हजेरी लावली. बेलापूरमध्ये ०.८ मि.मी., नेरुळमध्ये २.४ मि.मी., वाशीत १.६ मि.मी., ऐरोलीत १.८ मि.मी. अशा सरासरी १.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात कुठेही झाड पडल्याची घटना घडली नाही. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचे जोरदार आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हलक्या सरींनी शहरवासी सुखावले
By admin | Updated: June 20, 2016 02:37 IST