नवी मुंबई : अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. एक आठवड्यापूर्वी गांजा प्राशन करताना अटक केलेला माफिया अशोक पांडेला ३ सप्टेंबरला पहाटे पुन्हा अटक केली असून, त्याच्याकडून ७८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. नवी मुंबईमधील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. शहरात खुलेआम गांजाविक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. आतापर्यंत १३ ठिकाणी धाडी टाकून गांजा विक्री व प्राशन करणाऱ्या १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गांजामाफिया हरिदास विठ्ठल विधाते ऊर्फ टारझन याचाही समावेश आहे. टारझनप्रमाणेच जवळपास १५ वर्षांपासून अशोक पांडेही एपीएमसी परिसरात गांजा विक्रीचा व्यवसाय करत होता. सायन-पनवेल महामार्ग व यूपी कोल्ड स्टोरेजच्या मध्ये अनधिकृत झोपडी बांधून पांडे व्यवसाय करत होता. अमली पदार्थ विरोधी पथकाने ३० आॅगस्टला एपीएमसी मार्केटमध्ये गांजा ओढत असताना त्याला अटक केली होती. परंतु त्याच्याजवळ साठा सापडला नसल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसात पांडेने गांजा विक्री सुरू केली. एपीएमसीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. ३ सप्टेंबरला पहाटे तो गांजा विक्रीसाठी मॅफ्को परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पांडेला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे ७८० ग्रॅम गांजा सापडला. त्याच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तारमाळे, राहुल राक, उद्धव ढमाले यांच्या पथकाने केली.
गांजामाफिया पांडे पुन्हा गजाआड
By admin | Updated: September 7, 2016 03:00 IST