उरण : एमएमआरडीएच्या माध्यमातून होऊ घातलेल्या शिवडी-न्हावा सागरी सेतूमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळावी आणि इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी न्हावा ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी न्हावे ग्राम सुधार मंडळ व न्हावे-खाडी ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पावरच मोर्चा काढण्यात आला होता. संतप्त मोर्चेकऱ्यांनी शिवाजीनगर-कोपर येथील सुरू असलेले कामकाज चार तास बंद पाडले. अखेर प्रकल्प अधिकाºयांनी सहा महिन्यांत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यात यावी, भविष्यात होणाºया टोल नाक्यावर तसेच पुलावर नोकरभरतीत प्राधान्य मिळावे, न्हावे शिवडी सागरी सेतू पूर्णत्वास झाल्यानंतर सुरू होणाºया टोल वसुलीतून न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना टोल माफी मिळावी, तसेच एमएमआरडीए आणि टाटा कंपनीच्या सीएसआर फंडातून ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्यांसाठी मंगळवारी शिवाजीनगर, कोपर येथील एमएमआरडीए व टाटा कंपनीच्या कार्यालयावर हजारो ग्रामस्थांनी मोर्चा काढून धडक दिली.
न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे, ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष आशिष पाटील, माजी सरपंच हनुमान भोईर, चंद्रकांत भोईर, उपसरपंच किसन पाटील, न्हावे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप ठाकूर, माजी उपसरपंच व सदस्य हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चेकºयांनी प्रकल्पाचे सुरू असलेले कामकाज सुमारे चार तास बंद पाडले. त्यानंतर प्रकल्प अधिकाºयांनी नमते घेत, मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. विविध मागण्यांची पूर्तता सहा महिन्यांत करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिल्यावर ग्रामस्थांनी अखेर आंदोलन मागे घेतले.