नवी मुंबई : आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यांचा समावेश नसल्याने नावनोंदणीसाठी अडथळा निर्माण होत होता. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रक्रियेतील हा गोंधळ समोर आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने संकेतस्थळातील हा अडथळा दूर करून प्रवेशनोंदणीचा मार्ग मोकळा केला आहे.वंचित गटांतर्गत तसेच दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण घेता यावे, याकरिता आॅनलाइन नोंदणीद्वारे त्यांना मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली असता, पहिल्याच दिवशी पालकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले होते. नव्याने नोंदणी करणाऱ्या पालकांना जिल्ह्यांच्या यादीतून आवश्यक जिल्ह्याची निवड करता येत नव्हती. संकेतस्थळावर केवळ नाशिक जिल्ह्याचाच उल्लेख असल्याने उर्वरित ३५ जिल्ह्यांतील पालक आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिले होते. आरटीई आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील या गलथान कारभाराचा भांडाफोड ‘लोकमत’ने केला होता. तसेच संकेतस्थळावर मदतकेंद्राची दिलेली माहिती चुकीची असल्याचा मनस्ताप पालकांना होत असल्याचेही उघड केले होते. या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित यंत्रणेकडून चूक दुरुस्त करून नोंदणीकरिता जिल्हा निवडण्याचा पर्याय खुला केला आहे. मंगळवारपासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू होणार असल्याने सकाळपासून पालक त्याच्या प्रतीक्षेत होते.
आरटीई ऑनलाइनचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:47 IST