पेण : पेण शहराच्या पूर्व व पश्चिम भागातून वाहणाऱ्या भोगावती नदीपात्राला विश्वेश्वर मंदिर घाटाजवळील खोलगट भागात जलपर्णींनी विळखा घातला आहे. पेण नगर परिषदेचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व ललित पाटील मित्र मंडळाने या जलपर्णी हटाव मोहीम सुरू करून तीन वेळा जलपर्णी तोडली आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांत भोगावती नदीपात्र मोकळा श्वास घेईल.पेण शहरालगत पूर्व व उत्तर बाजूने वाहणारी भोगावतीच्या पात्राची लांबी ९.२८ चौ. कि.मी. असून, नदीपात्राची रुंदी ५०० मीटर आहे. नदीच्या ऐलतटावर पेणचे विश्वेश्वर मंदिराचा गणपती विसर्जन घाट तर पैलतटावर गणपती वाडी पेण शहराच्या विश्वेश्वर मंदिराजवळ नदीत संथ पाण्यावर जलपर्णींचा विळखा पडलेला आहे. पेण नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान थाटात राबविल्याने राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ९ कोटींचा निधी स्वच्छताविषयक उपक्रम, पाणीपुरवठा, निर्मल व हागणदारीमुक्त शहर या स्वच्छतेच्या सप्तपदी कार्यक्रमासाठी देऊ केलाय. पेण नगर प्रशासनाचे किरण शाह, आरोग्य अधिकारी दयानंद गावंड, पथदीप अधिकारी शिवाजी चव्हाण, पाणीपुरवठा अधिकारी योगेश पाटील, बांधकामचे राजू कुंभार यांच्यासह ललित पाटील मित्र मंडळाचे संकल्पक स्वत: ललित पाटील, अजय क्षीरसागर, बांधकाम सभापती महेंद्र कुंभार व पेण नगर प्रशासनाचे २५ व मंडळाचे २५ अशा ५० स्वयंसेवकांनी तब्बल तीन वेळा जलपर्णी मुळासकट तोडून भोगावतीचे पात्र जलपर्णीमुक्त करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
भोगावतीचे पात्र घेणार मोकळा श्वास
By admin | Updated: February 29, 2016 02:02 IST