नवी मुंबई : काँगे्रसचे माजी नगरसेवक प्रकाश माटे आॅगस्ट महिन्यापासून कोमात आहेत. जवळपास आठ महिने मृत्यूशी झुंज देत असलेल्या माटे यांची प्रकृती सुधारावी यासाठी कुटुंबीय व त्यांचे सहकारी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. परंतु या प्रयत्नांना यश येत नसल्याने रुग्णालयात त्यांना भेट देण्यासाठी गेलेल्या नगरसेवक व मित्रांनाही अश्रू आवरणे कठीण जात आहे. महापालिकेच्या २००५ मधील निवडणुकीमध्ये प्रकाश माटे वाशीमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पाच वर्षे काँगे्रसचे नगरसेवक असले तरी त्यांची सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मैत्री होती. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यापासून इतर सर्वांशी असलेली मैत्री त्यांनी कधीच लपविली नव्हती. राजकारणापेक्षा मैत्रीला नेहमीच प्राधान्य देणारे माटे मित्रांचे वाढदिवसही उत्साहात साजरे करायचे. परंतु आॅगस्ट २०१५ मध्ये अचानक मित्रांसोबत गप्पा मारताना ते जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले, परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही. सद्यस्थितीमध्ये त्यांचे डोळे उघडे असतात. समोरील व्यक्तीकडे पाहतात, परंतु त्यांना ओळखता येत नाही. कोमात गेलेल्या स्थितीमध्ये ते आठ महिन्यांपासून आहेत. सद्यस्थितीमध्ये नेरूळमधील तेरणा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी मनापासून त्यांची शुश्रूषा करत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग या ४२ वर्षेकोमात होत्या. तशीच स्थिती माटे यांची होणार नाही ना अशी चिंता सर्वांना सतावू लागली आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शहर अध्यक्ष विजय माने, नगरसेवक सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, प्रशांत पाटील, रमेश सिंह व माटे यांच्या इतर मित्रांनी नुकतीच तेरणा हॉस्पिटलमध्ये जावून माटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी माटे यांची स्थिती पाहून चौगुले यांच्यासह सर्वच नगरसेवकांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्वांनीच माटे यांची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)प्रकाश माटे यांनी आयुष्यभर मित्र जोडण्याचेच काम केले. आठ महिन्यांपासून जवळपास कोमात असलेल्या माटेची स्थिती पाहून अश्रू आवरणे कठीण झाले. कुटुंबीय त्यांची काळजी घेत आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येवून त्यांची प्रकृती सुधारेल अशी आम्हाला आशा आहे.- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते, महापालिका
माजी नगरसेवकाची मृत्यूशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 02:32 IST