नवी मुंबई : दिवाळीतील फटाक्यांमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली. गाळ्यांवरील शेड जळून खाक झाले. बुधवारी सकाळी तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरील वृक्षाच्या फांद्या व पाल्याला आग लागली सायंकाळपर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. मसाला मार्केटमधील जी ३६ गाळ्याच्या छताला फटाक्यामुळे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मार्केटध्ये रॉकेट उडविण्यात येत होती. त्यामधील एक छतावर पडल्याने तेथील बदामाचा भुसा व लागडांनी तत्काळ पेट घेतला. आगीमध्ये टेरेसवर टाकलेले शेड पूर्णपणे जळून खाक झाले आहे. बदाम फोडण्याची तीन मशीन जळून गेल्या आहेत. छतावर ठेवलेल्या भुशाच्या गोणी जळून खाक झाल्या आहेत. व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे छतावर लाकडी शेड टाकल्यामुळे पाच गाळ्यांवरील शेड जळून गेल्या. नवी मुंबई, ठाण्यामधील अग्निशमन दलाच्या वाहने तत्काळ घटनास्थळी जाऊन आग विझविण्यास सुरुवात केली. वेळेत आग विझविली नसती, तर पूर्ण जी विंग जळून खाक झाली असती. आग लागलेल्या दुकानासमोरच फटाक्यांचे स्टॉल आहेत. आगीमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. तत्काळ सर्व फटाके बाजूला काढून ठेवण्यात आले. महापालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरही सकाळी फटाक्यामुळे आग लागली. शहरातील वृृक्षांची छाटनी केल्यानंतर निर्माण होणारा कचरा एक कोपऱ्यात टाकण्यात येतो. रोज जवळपास २० टन फांद्या व त्याचा पाला डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. आगीमध्ये हा कचरा पूर्णपणे जळून गेला आहे. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु प्रचंड धूर असल्यामुळे आग विझविण्यात अडथळे निर्माण होत होते. जेसीबीच्या सहाय्याने माती टाकत अग्निशमन दलाची वाहनांना मार्ग करून देण्यात आला. सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
फटाक्यामुळे दोन ठिकाणी आग
By admin | Updated: November 14, 2015 02:05 IST