लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गतवर्षी राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे सभापतीपद हिरावून घेणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच हार पत्करली. सदस्य निवडीवरून झालेल्या गटबाजीमुळे सभापतीपदाची निवडणूक पक्षाने गांभीर्याने लढलीच नाही. ज्येष्ठ नगरसेवक असताना नवीन सदस्याला संधी देवून निवडणुकीपूर्वीच पराभव पत्करला. सेनेच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादीला झाला व संघर्ष न करता सभापतीपद मिळविण्यात ते यशस्वी ठरले. नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न पुन्हा एकदा अंतर्गत भांडणामुळे धुळीस मिळाले. दोन वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्याची एकही संधी त्यांनी दवडली नव्हती. दिघा येथील गवते कुटुंबीयांसह राष्ट्रवादीच्या अनेकांना सेनेत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पुढील महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेण्यास सुरवात केली होती. त्याचाच भाग म्हणून गतवर्षी स्थायी समिती सभापती निवडणुकीमध्ये काँगे्रसच्या पाठिंब्यावर विजय मिळवून सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. यावर्षीही पुन्हा सभापतीपद मिळविण्यासाठी विजय चौगुले, नामदेव भगत यांच्यासह अनुभवी सदस्यांना संधी दिली होती. परंतु सदस्य निवडीवरून पक्षात मतभेद झाले. विजय नाहटा व विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे मूळ यादीमध्ये बदल करून दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. परंतु यामुळे निर्माण झालेले मतभेद मिटले नसल्याने सभापतीपदासाठी काँगे्रसचे मत कोणी वळवायचे व फोडाफोडीचे राजकारण कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीकडे पूर्णपणे पाठ फिरविली. त्यांनी पनवेल व भिवंडी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. काँगे्रसनेही आघाडी धर्म पाळायचा निर्णय घेतला. गतवर्षी काँगे्रसचे मन वळविण्यामध्ये व राष्ट्रवादीच्या सदस्याचा मतदानाचा अधिकार नाकारण्याच्या रणनीतीमध्ये भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी मंदा म्हात्रे व विजय नाहटा यांच्यामधील वादही विकोपाला गेला आहे. यामुळे शिवसेनेच्यावतीने म्हात्रे यांची मदत घेण्यात आली नाही. विजय नाहटा व विठ्ठल मोरे यांनी सभापतीपद मिळवून दाखवावे अशी भूमिका चौगुले गटाने घेतली. यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच शिवसेनेने पराभव मान्य केला होता. अखेर ९ विरूद्ध ७ मतांनी राष्ट्रवादीने विजय मिळविला.
लढण्यापूर्वीच सेनेने पत्करली हार
By admin | Updated: May 24, 2017 01:45 IST