पनवेल : भाताण येथील श्री सद्गुरू कृपा शेतकरी संस्थेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमेटी विद्यापीठाच्या विरोधात उभारलेल्या लढ्याला यश आले आहे. या आंदोलनाच्या दणक्याने अमेटीचे व्यवस्थापन वठणीवर आले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत.गुरुवारी अमेटी विद्यापीठावर धडक मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांना अमेटी विद्यापीठामध्ये मोफत शिक्षण मिळावे, डोनेशन व फी माफ करणे, सर्व कामे ही शेतकरी संस्थेमार्फत चालवावी, अमेटी विद्यापीठात नोकर भरती असल्यास प्रथम शेतकरी संस्थेला कळविण्यात यावे अशा मागण्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या होत्या. या मागण्यांसाठी गुरु वारी सकाळी ९.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरूवात झाली. प्रवेशद्वारावर आंदोलकांनी धडक दिल्यानंतर व्यवस्थापनाने चर्चेचे आमंत्रण दिले, त्यावेळी आंदोलकांनी मागण्या मान्य करणार असाल तरच चर्चा करु अशी भूमिका घेतली.दुपारी साडेतीनच्या सुमारास कुलगुरू विजय खोले यांनी आपण सकारात्मक चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून आमदार प्रशांत ठाकूर, बाळासाहेब पाटील आदी मंडळींनी आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले. ३६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. यातील चार जणांना पूर्वी सेवेत घेण्यात आले असून सहा जणांना गुरु वारी नोकरींचे हमी पत्र जारी करण्यात आले आहे. उर्वरित २६ जणांना विद्यापीठामध्ये कंत्राटी पध्दतीने कामावर घेण्यात येणार आहे. या कामगारांपैकी १० जणांना मार्च २०१६ मध्ये तर उर्वरित १६ जणांना जून २०१६ अखेरपर्यंत विद्यापीठाच्या आस्थापनामध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच विविध कामांच्या ठेकेदारीतील ५० टक्के काम श्री सद्गुरू कृपा शेतकरी संस्थेला देण्याबरोबरच इतर मागण्या मान्य करण्यात आल्या.यावेळी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील, युवा नेते विनोद साबळे, पनप आरोग्य सभापती गणपत म्हात्रे, नगरसेवक गणेश पाटील, प्रकाश बिनेदार, नगरसेविका नीता माळी, कल्पना ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
अमेटीवर शेतकरी संस्थेचा मोर्चा
By admin | Updated: September 3, 2015 23:31 IST