लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड औद्योगिक वसाहत परिसरालगत असलेल्या जिते गावच्या कब्रस्तानालगतच्या मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात फेसाळ पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात तीन ते चार कारखाने असून या प्रदूषणाची जबाबदारी नक्की कोणाची हा प्रश्न आहे. टेमघर नाला आणि एम्बायो कारखान्यादरम्यान असलेले हे फेसाळ पाणी दलदल आणि गवतामधून वाहत असल्याने हे पाणी नक्की कोणाचे हे शोधण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.सावित्री नदीच्या प्रदूषणामध्ये टेमघर नाला हा फार महत्त्वाचा आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणारा टेमघर नाला शासनाच्या यादीवर नोंदणीकृत नसल्याने नाल्याला लगत अनेक कारखाने उभारण्यात आले आहेत, यामुळे प्रदूषणकारी कारखान्यांना प्रदूषण करणे सोपे झाले होते. उन्हाळ्याच्या दिवसात नाला आटल्यानंतर प्रदूषणाचे हे प्रमाण कमी असले तरी पावसाळ्यात छुप्या मार्गाने घातक रसायनयुक्त सांडपाणी नाल्यात सोडण्याचे उपद्व्याप अनेक कारखानदार करीत असतात. अशाच प्रकारे मंगळवारी संध्याकाळी जिते गावच्या कब्रस्तानालगत खासगी जागेत मोठ्या प्रमाणात फेसाळ पाणी ग्रामस्थांना आढळून आले. हे पाणी एम्बायो आणि फ्लुबोर कारखान्याच्या लगतच्या परिसरातून पुढे मोकळ्या जागी वाहत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एम्बायो कारखान्यालगत असलेल्या बौद्धवाडीतून एक नाला डोंगरावर पडलेल्या पावसाचे पाणी या परिसरात वाहत आणत असल्याचे एम्बायो कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. डोंगरातील आणि परिसरातील पावसाचे पाणी हा विषय लक्षात घेतला तरी पाण्याला निर्माण होणारा मोठ्या प्रमाणात फेस आणि रासायनिक दुर्गंधी परिसरातील कोणता तरी कारखाना पावसाचा गैरफायदा घेत पाणी प्रदूषित करत असल्याचे सिद्ध करून देत आहे. आमच्याकडून कोणत्याही तऱ्हेचे सांडपाणी बाहेर सोडले जात नाही.- आर. के. गीते, वरिष्ठ व्यवस्थापक पर्यावरण, एम्बायो कारखानाघटनास्थळाला भेट दिली, पाहणी केली असता परिसरात दुर्गंधी आणि फे साळ पाणी निदर्शनास आले. पाणी आणि फेसाचे नमुने गोळा करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषी कारखान्यावर कारवाई करण्यात येईल. - दिनेश वसावा, क्षेत्र अधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळनदीमधील जैवविविधतेची हानी कारखान्यातून निघणारे हे रासायनिक सांडपाणी परिसरातील स्थानिक नाल्यातून टेमघर नाल्यात व पुढे काळ आणि सावित्रीच्या संगमातून खाडीत येवून मिसळते. कारखानदारांच्या या प्रदूषणकारी वृत्तीमुळे कारखान्यांचा आर्थिक फायदा होत असला तरी पर्यावरणाची आणि परिसरातील नदी-नाल्यांमधील जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जिते गावच्या कब्रस्तानालगत असलेल्या या फेसाळ पाण्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड कार्यालयाला मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जावून पाणी आणि फेसाचे नमुने घेतले. संपूर्ण परिसर दलदल झाडी आणि गवतात असल्याने या शोधकामात त्यांना अडचणी येत आहेत.
जिते येथील मोकळ्या जागेत फेसाळ पाणी
By admin | Updated: July 6, 2017 06:28 IST