नवी मुंबई : शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होतो, अशी संकल्पना राज्यात सुरू करावी यासाठी ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान संपूर्ण शहरात राबविले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीबीडी सेक्टर १ परिसरातील सुनील गावस्कर मैदानात शनिवारी भरणारा बाजार या आठवड्यापासून स्थलांतरित करण्यात आला आहे. यापुढे दर शनिवारी सीबीडी सेक्टर ३ येथील राजीव गांधी स्टेडिअमच्या मोकळ््या जागेत बाजार भरणार आहे. या बाजारात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांना नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ १ कार्यक्षेत्रात जागा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पिंपरखेड, पेण, पुरंदर, शिरुर, भोर आदी भागातील शेतकरी येतात. गेल्या काही आठवड्यांपासून शेतकरी आणि स्थानिक विक्रेत्यांमधील वादामुळे या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा शेतकरीवर्ग या बाजाराच माल विक्रीसाठी घेऊन येत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या बाजारात भाजीपाला, फळे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी भाज्यांच्या किमतीत प्रतिकिलो ३ ते ४ रुपयांची वाढ केल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. याबाबत शिरुर येथील शेतकरी भूषण माने म्हणाले की, ग्राहकापर्यंत मालाची वाहतूक तसेच इतर खर्च पाहता शेतकऱ्यांना मनाजोगा भाव मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली.
सीबीडीतील आठवडी बाजाराचे स्थलांतर
By admin | Updated: March 20, 2017 02:12 IST