नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत इमारतींवर न्यायालयाच्या आदेशानुसार होत असलेल्या कारवाईच्या विरोधात शनिवारी सकाळी आंदोलन होणार होते. सकाळीच ठाणे-बेलापूर रस्ता अडवून चक्का जाम करण्याचा रहिवाशांचा प्रयत्न होता. याबाबत माहिती मिळताच पहाटेपासून येथे बंदोबस्त लावून पोलिसांनी आंदोलन हाणून पाडले.न्यायालयाच्या आदेशानुसार दिघा येथील ९९ अनधिकृत इमारती पाडण्याचे काम एमआयडीसीतर्फे सुरू आहे. या कारवाईत भूमाफियांना बळी पडलेली सुमारे तीन हजार कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे सदर इमारतींमध्ये वास्तव्याला असणाऱ्या रहिवाशांचा कारवाईला विरोध होत आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी आंदोलनदेखील झाले होते. परंतु पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे त्या ठिकाणचे आंदोलन टळले व कारवाईतला अडथळा दुर झाला. त्यामुळे पोलिसांना चाहूल न लागू देता ठाणे- बेलापुर मार्गावर चक्का जाम करण्याचा प्रयत्न तिथले रहिवासी शनिवारी सकाळी करणार होते. दिघा घरे बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन होणार होते असे समजते. या आंदोलनाची पूर्वतयारी काही दिवसांपासून तिथे सुरू होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सकाळी ६ वाजल्यापासूनच त्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आंदोलनासाठी येणारे पोलिसांचा बंदोबस्त पाहताच आल्या पावली परत जात होते. काहींनी संधी साधण्याचाही प्रयत्न केला. शिवाय पोलिसांनी वेळीच जमाव पांगवल्याने आंदोलन होण्याचे टळले. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलन टळले
By admin | Updated: October 11, 2015 00:57 IST