पनवेल : पनवेल शहरातील एसटी स्टँड शेजारील नव्याने उभारण्यात आलेल्या ओरियन माँलमध्ये शुक्रवारी रात्री काही अतिरेकी घुसल्याची अफवा पसरल्याने पनवेलमध्ये खळबळ उडाली. रातोरात सोशल मिडीयावर ही बातमी पसरली. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या दहशतवादी विरोधी मोहिमेंतर्गत ही मॉकड्रिल घेण्यात आली होती. पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे याठिकाणी उपस्थित होते. मॉलमध्ये अचानक दहशतवादी घुसल्याच्या अफवेने ग्राहकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. यावेळी सिडकोच्या अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. क्युआरटीचे अधिकारी एल. पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडे यांच्या पथकाने संपूर्ण मॉल शस्त्राधारी जवानांसह पिंजून काढला असता ठरल्याप्रमाणे ४ ते ५ व्यक्ती लपून बसल्याचे आढळले. या डमी अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले. आपत्काळात शासकीय यंत्रणा नेमकी किती वेळात पोहोचते, त्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजना, हे पाहण्यासाठी ही माँक ड्रिल घेण्यात आली होती. पनवेलकरांनी अशा प्रकराच्या घटनांना घाबरुन न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांनी केले. (प्रतिनिधी)
मॉक ड्रिलमुळे पनवेलच्या माँलमध्ये खळबळ
By admin | Updated: August 28, 2016 04:04 IST