टिटवाळा : घोटसई ग्रामपंचायत हद्दीतील खिंडीतील दर्ग्याजवळच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यात अंघोळीसाठी गेलेल्या टिटवाळा येथील महागणपती हॉस्पिटल परिसरातील सलमान इक्बाल सय्य्द (२४) व शानू अजित नुरानी (२२) या दोन तरु णांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नुकतेच मीरा रोड व मुंब्रा येथून टिटवाळा येथील महागणपती हॉस्पिटल परिसरात आपल्या परिवारासह सलमान व शानू हे दोघे राहण्याकरिता आले होते. इंदिरानगर येथील स्मशानभूमीजवळून घोटसई गावाकडे खिंडीतून रस्ता जातो. याच रस्त्यावर एक दर्गा आहे. या दर्ग्यात सलमान व शानू दोघे दुपारी ४ च्या सुमारास गेले होते. याच ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून तलाव तयार झाला आहे. यात सलमान व शानू अंघोळीसाठी उतरले. परंतु, पाणी खूपच खोल असल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. टिटवाळा पोलीस व कडोंमपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनाकरिता कल्याण येथील रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
साचलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
By admin | Updated: July 27, 2015 01:11 IST