डोंबिवली : इंटरनेट व्यवसायाच्या वादातून येथील खंबाळपाडा परिसरात व्यावसायिक अनिल काटे यांच्यावर भोईरवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या राहुल शेलारसह त्याच्या अन्य दोन साथीदारांनी गोळीबार करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२.५०च्या सुमारास खंबाळपाडा येथेच घडली. यासंदर्भात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून सोमवारी संध्याकाळपर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. काटे यांनी तक्रार दिली असून शेलार याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर हत्यार बाळगणे, त्याचा वापर करणे, जीवघेणा हल्ला करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार काटे हे नेहमीप्रमाणे व्यवसायाच्या दुकानाचे शटर बंद करून त्यांच्याकडे कामास असलेल्या कामगाराशी चर्चा करीत असताना कल्याण-शीळ रोडवरून आलेल्या एका चारचाकी वाहनातून शेलार याच्यासह अन्य दोघे तेथे आले. त्यानुसार त्यांनी काठे यांच्या दिशेने त्या व्यवसायासंदर्भात बोलून तुला ठार मारतो, असे बोलत रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
व्यावसायिकावर डोंबिवलीत गोळीबार
By admin | Updated: January 6, 2015 02:24 IST