सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या ६७० जणांना सर्प दंश झाला, तर २४१२ जणाना विंचू चावल्याची घटना घडल्या आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधील या घटना झाल्या. यात सुदैवाने एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनवणे यांनी केला. गेल्या वर्षी देखील मृत्यू झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र लोकमतने सर्व्हे केला असता शहापूरच्या बाबरवाडीत दोन भावंडे, भिवंडीच्या खोणीतील दोन भाऊ आणि खंबाळे येथील एकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या वर्षी देखील एकही मृत्यू नसल्याचा दावा केला आहे. या सर्प दंशाच्या सर्वाधिक घटना जून, जुलै, आॅगस्ट या कालावधीत घडल्या आहेत. पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे, निवासी क्षेत्र, पायवाटा, वर्दळीचे ठिकाणे, गवत, शेतातील पीकालगतचे तण, दगडाच्या आडोशाला असलेले सर्प व विंचू चावले. अशा रूग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वेळीच उपचार झाले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी एकही मृत्यू जिल्ह्यात झाला नसल्याचे प्रतिपादन डॉ. सोनवणे यांनी केले. गेल्या वर्षाच्या मे, जून, जुलै या तीन महिन्यात ठाणे, पालघर या दोन्ही जिह्यात सुमारे एक हजार १२ जणांना सर्प दंश झाला आहे. पण मागील आठ महिन्यात केवळ ठाणे जिल्ह्यातील ६७० जणांना सर्प दंश झाला. यामध्ये सर्वाधिक शहापूर तालुक्यातील २८७ जणांचा समावेश आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील १९७ जण आहेत, मुरबाडमधील ८४, अंबरनाथचे ७४ आणि कल्याणच्या २८ जणांना सर्प दंश झाला आहे. विंचू चावलेल्या दोन हजार ४१२ रूग्णांवर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार झाले. मागील दोन हजार १४५ विंचू दंशाचे रूग्ण होते. त्यात या वर्षी २६७ रूग्णांची वाढ होऊन विंचू दंशाचे दोन हजार ४१२ जण आढळले आहेत.
जिल्ह्यात ६७० जणांना सर्प तर २४१२ जणांना विंचू दंश
By admin | Updated: December 12, 2015 00:55 IST