अमोल पाटील, खालापूररायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस आहे. शनिवारपासून खालापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, खालापूर तालुक्यातील डोणवत, भिलवले, कलोते-मोकाशी या धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळेही धरण ओसंडून वाहत आहे. आतकरगाव, नढाळ, उसरोली व अन्य पाझर तलावही भरले आहेत. तालुक्यातील नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण मात्र अजूनही भरलेले नाही. मात्र मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असून, लवकरच हे धरणही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत २८ धरणे आहेत. त्याचबरोबर अनेक पाझर तलावही रायगडमध्ये आहेत. खालापूर तालुक्यात मोरबे हे धरण मोठे असून, जलसंपदा विभागाकडून नवी मुंबई महापालिकेने हे धरण विकत घेतले आहे. या धरणातून नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणीसंचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेले आठ दिवस खालापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असला तरी मोरबे धरण मात्र अद्याप भरलेले नाही. तालुक्यातील डोणवत, भिलवले व कलोते-मोकाशी ही धरणे पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. खालापूरमध्ये सोमवारी दिवसभरात २४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ९७९.३ इतका मि.मी. पाऊस गेल्या काही दिवसांत खालापूर तालुक्यात पडला आहे.नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी असून, भिलवले २.१० दशलक्ष घनमीटर, कलोते-मोकाशी ४.१९ दशलक्ष घनमीटर तर डोणवत धरणामध्ये ३.२७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहतो. त्यातील भिलवले धरणाचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. तर कलोते मोकाशी व डोणवत धरणातील पाणी शेती आणि उद्योगासाठी वापरण्यात येते. आजूबाजूच्या गावातील पाणी योजनाही या धरणावर अवलंबून आहेत. या क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणे भरली आहेत.
खालापूर तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो
By admin | Updated: July 13, 2016 02:09 IST