नवी मुंबई : कॉलेजभोवती गराडा घालणाऱ्या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी काँग्रेसतर्फे वाशी पोलिसांना करण्यात आली आहे. या रोडरोमियोंच्या स्टंटबाजीचा त्रास होत असल्याची तक्रार महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी एन.एस.यू.आय. कडे केली होती. कॉलेज आवारात गस्त घालण्याच्या मागणीचे निवेदन वाशी पोलिसांना देण्यात आले.वाशीत अनेक महाविद्यालये असून काही महाविद्यालये संपूर्ण शहरात प्रसिध्द आहेत. त्याठिकाणी नवी मुंबईसह लगतच्या शहरातून देखील विद्यार्थी - विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. अशावेळी महाविद्यालयीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात अनेक रोडरोमियो देखील कॉलेजभोवती फेऱ्या मारत असतात. यासाठी मोटरबाईक अथवा कारची स्टंटबाजी देखील त्यांच्याकडून होत असते. यामुळे कॉलेज सुटण्याच्या वेळेत वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील, मोतीलाल झुनझुनवाला, साईनाथ व इतर महाविद्यालयभोवती तरुणांचा घोळका जमलेला असतो. अशावेळी तिथून ये-जा करणाऱ्या तरुणींची छेड काही जण काढतात. हा प्रकार एखाद्या तरुणीच्या जिवावर देखील बेतू शकतो. त्यामुळे रोडरोमियोंकडून होणाऱ्या मनस्तापाची तक्रार काही तरुणींनी नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाच्या नवी मुंबई पदाधिकाऱ्यांकडे केली होती. यावेळी नगरसेविका फशीबाई भगत, वैजंती भगत, रुपाली भगत व एन.एस.यू.आय. जिल्हा उपाध्यक्ष मनोज महाराणा, अर्चना कुंभार आदी उपस्थित होते. पोलिसांनी गस्त घालून त्या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 23:44 IST