नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या आडून डेब्रिज माफियांनी शहरात धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणच्या मैदानांवर डेब्रिजचे ढीग दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर खाडी किनाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याचे दिसून आले आहे. विशेषत: कोपरखैरणे, घणसोली व वाशी विभागात हे प्रकार अधिक जाणवत आहेत.शहरात बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना आखल्या आहेत.भरारी पथकांमार्फत डेब्रिज माफियांवर पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे डेब्रिज माफियांच्या कारवायांना काही प्रमाणात आळा बसला होता. असे असले तरी गणेशात्सवाच्या आडून हे डेब्रिज माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित सर्व यंत्रणा उत्सवाच्या नियोजनात गुंतल्याने याचा फायदा डेब्रिज माफियांनी घेतला आहे. परिणामी शहरातील मोकळे मैदाने, उद्यानाच्या जागा, रस्ते, पदपथ तसेच खाडी किनाऱ्यांवर या काळात मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याचे पाहावयास मिळते. कोपरखैरणत होल्डिंग पॉण्डच्या परिसरात गेल्या चार - पाच दिवसांत डेब्रिजच्या आठ ते दहा गाड्या रिकाम्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे घणसोली पामबीच मार्गावरही ठिकठिकाणी डेब्रिज टाकल्याचे पाहावयास मिळते. वाशी विभागातील जुहूगाव खाडी किनाऱ्यावर तर जागोजागी डेब्रिज टाकल्याचे पाहावयास मिळते. (प्रतिनिधी)
उत्सवाच्या आडून डेब्रिज माफिया सुसाट
By admin | Updated: September 29, 2015 00:41 IST