नवी मुंबई : धूलिवंदनाच्या दिवशी दिघा येथे दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामधील एकाचा तलावात बुडून मृत्यू झाला असून दुसऱ्याच्या हत्येची शक्यता वर्तवली जात आहे.गुरुवारी दुपारच्या सुमारास दिघा परिसरात दोन मृतदेह सापडले आहेत. ठाणे - बेलापूर मार्गालगतच्या दिघा येथील तलावात एक जण बुडाल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सुनील साळुंखे (४१) असे त्यांचे नाव असून ते गणेश चाळमधील राहणारे आहेत. मृतदेहावर कोणत्याही प्रकारची गंभीर जखम नाही. त्यामुळे पोहताना त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी व्यक्त केला आहे.याचदरम्यान ईश्वरनगर परिसरातील रेल्वेच्या तलावालगत डोंगरकिनारी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सुमारे २५ वर्षे वयाच्या तरुणाचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटलेली नाही. दिघा परिसरात चौकशी करूनही त्याची ओळख पटलेली नसल्याने तो मुंब्रा परिसरातला राहणारा असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्या शरीरावर कोणताही घाव आढळलेला नाही. त्याच्या मृत्यूची नोंद रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
दिघा येथे दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:58 IST