लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर बंदी घातल्यानंतर पर्यटकांनी लहान-मोठ्या धबधब्यांकडे धाव घेतली आहे. पांडवकडा धबधब्यापासून काही अंतरावर असलेला मिनी पांडवकडा धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याठिकाणी रविवारी हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पाजवळ ड्रायविंग रेंजमध्येही गर्दी होती. शेकडो वाहने परिसरात दाखल झाल्याने याठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. शेकडो मद्यपींना पोलिसांनी पाठवले परत वीकेंडमुळे वर्षासहलीसाठी गाढेश्वर धरणावर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने मद्यपी नाराज झाले. प्रत्येक गाडी चेक करून पुढे सोडण्यात येत होती. पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरण परिसरात पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात. अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवाला मुकतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय पोलीस गस्तही असते. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक गाढेश्वर (देहरंग) धरणावर येतात. पोलिसांची नजर चुकवून काही जण जातात, तर काही पर्यटक दुसऱ्या रस्त्याने धरणाच्या दिशेने जातात. मात्र धरणाकडे गेटला कुलूप असल्याने कुणालाही आत जाता येत नाही. तरुणाईकडून धोदाणी धबधब्यालाही पसंती देण्यात येत आहे. मात्र वाजे गावाजवळ बेरिगेट्स लावून बसलेले पोलीस गाड्या तपासूनच पुढे पाठवत आहेत. मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी धरणाच्या परिसरात बुडून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे. मुसळधार पावसामुळे गाढी नदीला पूर आला आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये व जीव धोक्यात घालू नये असा संदेश पोलिसांकडून देण्यात येत आहे.
खारघरच्या मिनी पांडवकड्यावर पर्यटकांची गर्दी
By admin | Updated: July 17, 2017 01:33 IST