पनवेल : पनवेलमध्ये आदिवासी योजनांच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी धनंजय बेडदे, मुकुंद सोळसे यांच्यासह इतर पाच जणांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पनवेल वसतिगृहात २०१३-१४ मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी स्पीकिंग कोर्स व महिलांसाठी गारमेंट मेकिंगचे प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम व शिलाई मशिन साहित्य वाटप करण्यात आले. मात्र ही योजना फक्त कागदावरच राबविण्यात आली असून, शासनाचे लाखो रुपये संस्थाचालकांनी हडप केले आहेत. त्या विरोधात प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धनंजय बेडदे (संस्थाचालक), मुकुंद सोळसे (तत्कालीन प्रभारी आदिवासी विकास निरीक्षक) यांच्यासह इतर पाच जणांविरोधात कारवाई केली आहे. बेडदे हे लोकमाता अहिल्याबाई होळकर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी गारमेंट मेकिंगचे प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासपत्र व शिलाई मशिन साहित्य वाटप ही योजना २०१३ - १४ मध्ये राबविण्यात आली. योजनेअंतर्गत ५० आदिवासी महिलांना गारमेंट मेकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थी महिलेला शिलाई मशिन दिल्याची नोंद आदिवासी विकास विभागात आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही. तालुक्यातील फणसवाडी, वाघाची वाडी, ताडपट्टी, बेलवाडी, बापदेव वाडी, देहरंग या आदिवासी पाड्यांवरील महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत आहेत. योजना राबविल्याबद्दल ठेकेदाराला १० लाख ३२ हजार ५०० रु पये देण्यात आले आहेत. तसेच दोन महिन्यांसाठी मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे प्रशिक्षणही कोळवाडी येथील विद्यार्थ्यांना दिले नसल्याचे उघड झाले आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी ४ लाख ९६ हजार ३७६ रुपये लोकमाता अहिल्याबाई होळकर या संस्थेला देण्यात आले होते. या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
पनवेलमध्ये आदिवासी योजनांच्या नावे भ्रष्टाचार
By admin | Updated: July 13, 2016 02:11 IST