नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी महानगरपालिकेने विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये कोरोना चाचणी शिबिरांचे आयोजन केले जात असून, दोन विशेष केंद्रही सुरू केली आहेत. आतापर्यंत ८,०५५ जणांच्या चाचण्या पूर्ण केल्या असून, १९१ रुग्ण आढळून आले आहेत.‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने उद्योग-व्यवसायांना सुरुवात झाली आहे. सर्वात मोठा औद्योगिक पट्टा असणाऱ्या ठाणे-बेलापूर पट्ट्यातही उद्योग समूह सुरू झाले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार, २८ सप्टेंबरपासून विविध कंपन्यांमध्ये जाऊन तपासण्या केल्या जात आहेत. याशिवाय ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनच्या कार्यालयातही तपासणी केंद्र कार्यान्वित आहे. आतापर्यंत ८,०५५ अधिकारी, कर्मचारी यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये १९१ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांवर लगेच उपचार सुरू करण्यात आले असून, त्या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील २२हून अधिक व्यक्तींचीही तपासणी करण्यात आलेली आहे.मनपाने २४ मोठ्या उद्योग समूहांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लहान उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनामार्फत टीबीआयएच्या कार्यालयात आणून टेस्टिंग केले जात आहे. मागील ५ दिवसांपासून दिघा येथील मुकंद कंपनीत विशेष तपासणी शिबिर होत असून, त्या ठिकाणी दररोज साधारणत: ३०० कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे.
CoronaVirus News : एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:58 IST