नवी मुंबई : महापालिकेच्या सक्षम उपाययोजनांमुळे नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. असे असले तरी शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ८२ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून शहरात आतापर्यंत एकूण ५०,२९१ रुग्ण सापडले आहेत. असे असले तरी त्यापैकी ४८,२५७ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
मार्चनंतर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत गेल्याने रुग्णांची एकूण संख्या ५०,२९१ इतकी झाली आहे. तर १०३३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचारपध्दतीचा अवलंब केला. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले. त्यामुळे मृत्यूंचा आकडा दिवसाला २ ते ३ वर येऊन ठेपला आहे. पूर्वी हाच आकडा प्रतिदिनी ५ ते ६ इतका होता. मृत्युदर कमी करण्याबरोबरच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या. त्यामुळे रुग्णांच्या दैनंदिन आकड्यात घट झाली. महापालिकेने आतापर्यंत.४,१३,५९४ इतक्या कोरोना चाचण्या केल्या आहेत.
यात आरटीपीसीआर १,५८,५२३ आणि २,५५,०७१ अँटिजेन टेस्टचा समावेश आहे. अनलॉकअंतर्गत महापालिकेने शहरातील बहुतांश व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची अनुमती दिली आहे. मात्र मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात धुणे व शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यालासुध्दा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळेच शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. सध्या १,००१ रुग्ण महापालिकेच्या विविध केंद्रांत उपचार घेत आहेत.दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु त्यादृष्टीने महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे.
महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यशमहापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. असे असले तरी पुढील काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.