- वैभव गायकर पनवेल : सध्याच्या घडीला कोविड-१९ विषाणूचा फैलाव जलद गतीने होत आहे. संसर्ग वाढत असून अत्यावश्यक सेवेतील घटकांमध्ये कोविडची लागण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामध्ये डॉक्टर्स तसेच परिचारिकांची प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत पनवेलमधील कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स व संपूर्ण स्टाफ कोरोनाविरोधात यशस्वी लढा देत आहे.उपजिल्हा रुग्णालयाला कोविड-१९चा दर्जा दिल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त तसेच कोरोना संशयितांवर या ठिकाणी उपचार होत आहेत. अद्याप ३५ कोविडच्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले आहेत, तर २५० पेक्षा जास्त नागरिकांची स्वॅब तपासणी या ठिकाणी घेण्यात आली आहे. पनवेलमधील कोविड-१९ रुग्णालयात एकूण २१ डॉक्टर्स तसेच ४१ इतर कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. सध्याच्या घडीला कोविडचा संसर्ग लक्षात घेता, आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. तीन दिवसांपूर्वी दहा कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी टाळ्यांच्या कडकडाटात रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.पनवेलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्याच्या घडीला पालिका हद्दीत २२ व पनवेल ग्रामीण भागात ७ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. अशा परिस्थितीत कम्युनिटी संसर्गाचा धोका वाढल्याने नागरिकांनी सतर्कता म्हणून घरीच थांबणे गरजेचे असल्याचे कोविड रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले.कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यातच संशयित नागरिकांना कोविड रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल केले जात आहे. अशा नागरिकांचे स्वॅब घेणे, त्यांची तपासणी करणे आदी कामे येथे नियमित होत आहेत. कोरोना रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणाºया पनवेलमधील कोविड रुग्णालयातील संपूर्ण डॉक्टर्स, परिचारिकांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत. नागरिकांनी लॉकडाउनचे पूर्णपणे पालन करावे. कम्युनिटी संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी घरीच थांबणे गरजेचे आहे.- डॉ. नागनाथ यमपल्ले(अधीक्षक, कोविड-१९ रुग्णालय, पनवेल)
CoronaVirus: कोरोना योद्ध्यांचा लढा कौतुकास्पद; पनवेलमध्ये १० रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 01:35 IST