- नामदेव मोरेनवी मुंबई - कोरोना लसीकरणाला नवी मुंबईमध्ये प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रतिदिन निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टापैकी सरासरी ८९ टक्के उद्दिष्ट साध्य होऊ लागले आहे. शहरात ११ केंद्र सुरू केली असून, नवीन केंद्र वाढविण्याची परवानगी महानगरपालिकेने केली असून, लवकरच पोलीस व मनपा कर्मचारी यांनाही लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे.नवी मुुंबईमध्येही सुरुवातीला कोरोना लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु आयुक्त अभिजीत बांगर यांनी तत्काळ लसीकरणाविषयी शंकांचे निरसर केल्यामुळे व लस घेतलेल्यांचे अनुभव प्रसारित केल्यामुळे शहरात लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला आहे. पहिल्या टप्यात १७ हजारपेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी यांना लस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सुरुवातीला पाच ठिकाणी केंद्र होती. आता ११ केंद्र सुरू केली आहेत. २९ जानेवारीपर्यंत ६,१०० जणांपैकी ५,४२४ जणांना लस देण्यात आली होती. एकूण उद्दिष्टापैकी हे प्रमाण ८९ टक्के आहे. महानगरपालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी व इतर अभियान मनपाने यशस्वीपणे राबविले होते. याच पद्धतीने लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात येत आहे. आयुक्त अभिजीत बांगर हे स्वत: नियमित आढावा घेत आहेत. आवश्यक त्या सुधारणा सुचविल्या जात आहेत. लसीकरणाबाबत काही शंका असतील, तर त्या तत्काळ साेडविण्याच्या सूचनाही करण्यात येत आहेत.महिला कर्मचाऱ्यांचाही प्रतिसादनवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचाही लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी केेलेल्या कर्मचारी लसीकरणास उपस्थित राहात आहेत. काही शंका असल्यास त्यांचे निरसन केले जात आहे. यामुळे लसीकरण सुरळीत सुरू असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नवी मुंबई पालिका क्षेत्रात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवीन केंद्र वाढविण्यासाठी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबतच पोलीस व मनपा कर्मचारी यांनाही लवकरच लस देण्यात येणार आहे. लसीचा पुरेसा साठा असून, आवश्यकतेप्रमाणे लसीचा दुसरा साठा मागविण्यात येणार आहे.- अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका मनपाकडे ४० हजार डोसमहानगरपालिकेकडे ४० हजार डोस प्राप्त झाले आहेत. २० हजार नागरिकांना लस देता येईल एवढे ढोस उपलब्ध आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबर पोलीस व मनपा कर्मचारी यांना लस देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी प्रशासनाने शासनाकडे केली आहे. सद्यस्थितीत लसीचे डोस पुरेशा प्रमाणात असून, आवश्यकतेप्रमाणे डोसचा दुसरा साठा मागविण्यात येणार आहे.महानगरपालिका क्षेत्रात सद्यस्थितीत ११ केंद्र आहेत. शहरात अजून नवीन केंद्र सुरू करण्याची क्षमता मनपाकडे आहे. यामुळे नवीन केंद्रांना परवानगी मिळावी, अशी मागणीही महानगरपालिकेने केली आहे. लसीकरण मोहीम गतीने राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Corona vaccination: कोरोना लसीकरणात प्रतिसाद वाढल्याने नवी मुंबईची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 11:49 PM