वैभव गायकर, पनवेलतालुक्यातील अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ हजार विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पोषण आहार मिळत नसल्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थीसंख्येतही घट होत आहे. त्यामुळे कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पनवेल तालुक्यात ३२५ अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या येतात. ३ ते ६ वयोगटातील बालकांना सकस व पोषक आहार मिळावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पनवेलमधील अंगणवाड्यांमध्ये दोन महिन्यांपासून पोषण आहार न मिळाल्याने १८,८९५ मुलांना खाऊ वाटप झालेले नाही. यापूर्वी खाऊ वाटपाचे काम स्थानिक बचत गटांना देण्यात आले होते. मात्र ते अचानक बंद करून पुणे येथील जननी महिला मंडळाला देण्यात आल्याचे समजते. त्यांनी आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत अंगणवाड्यांना शालेय पोषण आहार पुरविला. मात्र आॅक्टोबर २०१५ पासून पोषण आहार न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप बंद झाले आहे. वारंवार मागणी करूनही बालकांना पोषण आहार मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.पनवेल तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये प्रकल्प १ आणि प्रकल्प २ असे मिळून जवळपास १८ हजारांहून अधिक बालके अंगणवाड्यांमध्ये येतात. त्यातील मध्यम कुपोषित असलेल्या मुलांची संख्या ९७२ हून अधिक, तर अतिकुपोषित विद्यार्थ्यांची संख्या १४३ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोषण आहार मिळत नसल्यामुळे कुपोषित मुलांची संख्या वाढत चालली असल्याचे निदर्शनास येत आहे.
अंगणवाडीत पोषण आहार बंद
By admin | Updated: December 9, 2015 00:58 IST