पालिकेच्या तिजोरीची चार वर्षे साफसफाई

By admin | Published: January 22, 2017 03:21 AM2017-01-22T03:21:34+5:302017-01-22T03:21:34+5:30

यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाई करण्याचा ठेका महापालिकेने आॅक्टोबर २०१२मध्ये दोन खासगी कंपनीला दिला आहे. साफसफाईच्या या कामावर देखरेख करणारी सक्षम यंत्रणाच

Cleaning of the bank safe for four years | पालिकेच्या तिजोरीची चार वर्षे साफसफाई

पालिकेच्या तिजोरीची चार वर्षे साफसफाई

Next

- नामदेव मोरे, नवी मुंबई

यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाई करण्याचा ठेका महापालिकेने आॅक्टोबर २०१२मध्ये दोन खासगी कंपनीला दिला आहे. साफसफाईच्या या कामावर देखरेख करणारी सक्षम यंत्रणाच नसल्याने रस्त्यांवरील कचऱ्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीचीच साफसफाई सुरू झाली आहे. काही महिन्यांपासून चक्क पालिकेची हद्द सोडून सायन-पनवेल महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागातून किलोमीटर वाढविण्यासाठी वाहने फिरविली जात आहेत.
देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये नवी मुंबई महापालिका आघाडीवर आहे. क्षेपणभूमीपासून मलनि:सारण केंद्रापर्यंत देशातील सर्वात चांगले प्रकल्प येथे उभारले आहेत. याचाच भाग म्हणून २०१२मध्ये यांत्रिकीपद्धतीने रस्त्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील पामबीच, ठाणे बेलापूर व अंतर्गत काँक्रेटच्या रस्त्यांची यांत्रिक मशिनच्या साहाय्याने सफाई करण्याचा ठेका बीव्हीजी व अ‍ॅन्थोनी वेस्ट हँडलिंग कंपनीला दिला आहे. पहिल्या दीड वर्षामध्ये यांत्रिक साफसफाईसाठी तब्बल ८ कोटी ९७ लाख रुपये खर्च झाले होते. महिन्याला जवळपास ४० ते ५० लाख रुपयांचा खर्च या कामावर होत आहे. आधुनिक प्रणालीचा वापर करणे आवश्यक असले तरी त्या कामातून साध्य काय होत आहे हे पाहणेही पालिकेची जबाबदारी आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये साफसफाईच्या कामावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे रस्ते सफाईऐवजी किलोमीटर वाढवून जादा पैसे काढण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. साफसफाई करणारी वाहने रोडच्या व दुभाजकाच्या मध्यभागावरून फिरणे आवश्यक आहे; पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी दुभाजक व कचरा असलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन फूट आतील भागातून वाहने चालविली जात आहेत.
यांत्रिक साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांना कोणत्या रोडची साफसफाई करायची ते मार्ग ठरवून दिले आहेत; पण मागील काही दिवसांपासून या वाहनांच्या मदतीने सायन-पनवेल महामार्गावर साफसफाई केली जात आहे. महामार्गाची साफसफाई करण्याची जबाबदारी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे; पण पालिकेने स्वत: ही जबाबदारी घेतली असून त्यासाठीचा खर्चही पालिकेच्या तिजोरीतून केला जात आहे. महामार्गावरून फिरणारी वाहने रोडच्या मध्यभागावरून चालविली जात आहेत. यामुळे कचरा साफ होत नाहीच; पण धूळ मोठ्या प्रमाणात उडू लागली आहे. धुळीचे लोट महामार्गावर पसरू लागल्याने इतर वाहनधारकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. घनकचरा विभागाचा एकही कर्मचारी नसतो. यामुळे पालिकेचे नुकसान होत असून नियमाप्रमाणे काम न करताही ठेकेदाराला बिले दिली जात आहेत. या कामांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.


सायन-पनवेल महामार्ग, पामबीच रोड, ठाणे बेलापूर रोड या मार्गावरून यांत्रिक साफसफाई करणारी वाहने फिरत आहेत. दोन्ही बाजूने वाहने फिरविली जात आहेत; पण प्रत्यक्षात रोडच्या डाव्या बाजूला रोडच्या कडेला कचराच नसतो. रोडच्या दोन ते तीन फूट बाजूने वाहने फिरविली जात आहेत. दुभाजकाच्या बाजूचाच कचरा साफ होतो. यामुळे एक बाजूला कचरा नसताना वाहने फिरवून पालिकेची तिजोरी रिकामी केली जात असून या कामाची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Web Title: Cleaning of the bank safe for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.