नवी मुंबई : शिल्लक घरांच्या विक्रीचा माेठा पेच सिडकोसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे घरांची नवीन योजना जाहीर करणेही अडचणीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर घरांच्या विक्रीसाठी किमतीसह अटी आणि शर्तींमध्ये काही शिथिलता आणण्याचा विचार सिडको करत असल्याची माहिती आहे.नवी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने २०१७ ते २०१९ दरम्यान खारघर, तळोजा, घणसोली, कळंबोली, द्रोणागिरी या भागात उभारलेली विविध गृहप्रकल्पांतील हजारो घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
अलीडकेच जाहीर केलेल्या २५ हजार घरांच्या योजनेतील आठ ते नऊ हजार घरे शिल्लक आहेत. यात सर्वाधिक घरे तळोजा नोडमधील आहेत. या घरांच्या किमती अधिक असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्यामुळे अनेकांनी ती नाकारली आहेत. परिणामी सिडकोची आर्थिककोंडी झाली आहे. घरांच्या किमती कमी करण्याबाबत सिडकोवर दबाव आणला जात आहे. राज्य शासनाचा संबंधित विभागसुद्धा याबाबत गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे.
लवकरच बंपर याेजनाकाही दिवसात घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने सिडको आपल्या आगामी गृहयोजनेची आखणी करीत आहे. शिल्लक आणि नवीन घरांचा समावेश करून आगामी काळात गृहविक्रीची बंपर योजना आणण्याच्या दृष्टीने सिडको चाचपणी करीत असल्याचे समजते.