नवी मुंबई : सिडकोच्या मोकळ्या जागा खासगी व्यावसायिकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या जागा संरक्षित करण्यात सिडकोच्या संबंधित विभागाला स्वारस्य वाटत नसल्याने फुकट्या व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. याचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी अशा मोकळ्या बिनभाड्याच्या जागांवर अनेकांनी बेकायदा उद्योग थाटल्याचे दिसून आले आहे.शहरात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. मोकळ्या जागा बळकावून त्यावर रातोरात अतिक्रमण केले जात आहे. वास्तविकपणे आपल्या मालकीच्या जागा संरक्षित करणे गरजेचे असतानाही सिडकोकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. विशेषत: जुहू गावात असा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. वाशी-कोपरखैरणे मार्गावरील मरीआई मंदिराच्या शेजारी सिडकोच्या मालकीचा एक मोठा भूखंड आहे. काही वर्षांपूर्वी या भूखंडांला कुंपण घालून सिडकोने तो संरक्षित केला आहे. तसा फलक ही भूखंडाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. असे असतानाही या भूखंडावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. रोपवाटिका, बांधकाम साहित्याचे विक्रेते, चायनीजचा धाबा आदी व्यवसाय येथे राजरोजपणे सुरू आहेत. त्याचप्रमाणे जुहू गावच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेनेची शाखा आहे. या शाखेला लागूनच सिडकोचा मोठा भूखंड आहे. या भूखंडावर सुद्धा बांधकाम साहित्याचे विक्रेत, गॅरेज, रोपवाटिका व चायनीजच्या धाब्याचे अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक लोक या भूखंडावरील व्यावसायिकांकडून बेकायदेशीर भाडे वसूल करीत असल्याचे बोलले जाते. जुहू गावाच्या खाडीकिनाऱ्याजवळील हरित पट्ट्यासाठी आरक्षित असलेल्या जागासुद्धा अनेक व्यावसायिकांना परस्पर भाडेतत्त्वावर दिल्या गेल्याचे समजते. वारंवार तक्रारी करूनसुद्धा सिडकोच्या संबंधित विभागाकडून कारवाई झाली नाही. दरम्यान, यासंदर्भात सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
सिडकोच्या जागा व्यावसायिकांना आंदण
By admin | Updated: October 12, 2015 04:55 IST