नामदेव मोरे, नवी मुंबईसिडकोने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणे यांचा अवमान करण्यात आला. राजशिष्टाचार डावलून त्यांना आमदारांच्या नंतर बसण्यासाठी जागा दिली. आभार प्रदर्शन करतानाही महापौर व महापालिकेचे नावही घेण्यात आले नाही. यामुळे पालिका वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वाशी येथे करण्यात आला. एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये नवी मुंबईचे प्रथम नागरिक महापौर सुधाकर सोनावणे यांना योग्य वागणूक देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांच्या एका बाजूला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बसण्यासाठी आसन दिले होते. राजशिष्टाचाराप्रमाणे दुसऱ्या बाजूला महापौरांना बसविणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना बसविण्यात आले होते. त्यांच्यानंतर महापौर व त्यांच्या बाजूला ऐरोलीचे आमदार यांना बसविण्यात आले होते. या प्रकाराविषयी शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी सर्वांचे आभार मानले. आभार मानताना कार्यक्रमाला उपस्थित नसलेल्या खासदार राजन विचारे यांचेही नाव घेतले. सिडकोच्या कर्मचाऱ्यांचेही आभार मानले, परंतु महापौर व महापालिकेचे नाव मात्र घेण्यात आले नाही. सिडकोने राजशिष्टाचार पाळला नसला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांच्या भाषणामध्ये पालकमंत्र्यांच्या नंतर महापौरांचे नाव घेतले. यानंतर आमदारांच्या नावाचा उल्लेख करून शिष्टाचाराचे तंतोतंत पालन केले. नवी मुंबईमध्ये राजशिष्टाचारावरून अनेकवेळा वादळ उठले आहे. आमदार मंदा म्हात्रे विधान परिषद सदस्य असताना त्यांना सीबीडीमधील सभागृहाच्या उद्घाटनाला बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी सभागृहाच्या ठिकाणी येऊन थेट नाराजी व्यक्त केली होती. हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. यानंतर दिवाळेमध्ये जेट्टीच्या उद्घाटनावर त्यांचे नाव टाकल्यानंतर ती पाटी काढली होती. त्यावरूनही त्यांचे व तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांचे भांडण झाले होते. यानंतर गणेश दर्शन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्येही त्यांनी राजशिष्टाचार चुकविल्याबद्दल नाराजी व्यक्त करून महापालिकेविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला होता. आता चक्क शहराच्या प्रथम नागरिकांनाही सार्वजनिक कार्यक्रमात डावलण्यात येत असल्यामुळे शहरवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. यापूर्वी एपीएमसीमध्ये माथाडी मेळाव्यामध्येही महापौरांना एका कोपऱ्यात जागा दिली होती. वारंवार हा प्रकार होणे हा महापौरांचा व शहराचाही अवमान असल्याची प्रतिक्रिया दक्ष नागरिकांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी याविषयी सिडको व शासनाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. त्यांच्या पदाचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे. शहरातील राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जवरही योग्य ठिकाणीच त्यांचा फोटो असला पाहिजे. शासकीय कार्यक्रमांतही राजशिष्टाचाराप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. त्यांचा अवमान हा शहराचा अवमान असल्यामुळे सिडको, महापालिकेसह शासनाकडे तक्रार करणार आहे. - किरण ढेबे, नागरिक, सीवूड
सिडकोच्या कार्यक्रमात महापौरांचा अवमान !
By admin | Updated: December 8, 2015 01:02 IST