पूनम गुरव ,नवी मुंबईनवी मुंबईतील कचरावेचक महिलांच्या मुलांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेवून कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना मुलांनी मिळविलेल्या यशामुळे या श्रमिकांच्या घरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई परिसरामध्ये कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या २० मुलांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १९ मुलांनी ५० हून अधिक टक्केवारी संपादन केली आहे. स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने या मुलांसाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी शिकवणी वर्ग घेतले जात होते. तसेच अनेक सामाजिक संस्थांनी या मुलांना अर्थसहाय्य केले. महानगरपालिकेच्या सारसोळे शाळेय शिकत असणाऱ्या भक्ती बालाजी लोहार हिला दहावीच्या परीक्षेत ८३ टक्के गुण मिळाले आहे. तिचे वडील बिगारी काम करतात आणि आई कचरा वेचण्याचे काम करते. घरात चार बहिणी असून भक्ती सर्वात मोठी आहे. घरचा खर्च आणि शिक्षणासाठी आई वडिलांना दिवसरात्र मेहनत घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीवर मात करून पुढे तिला कॉम्प्युटर इंजिनिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार ती प्रयत्न करणार असल्याचे भक्ती लोहार हिने सांगितले.तुर्भे येथील सामंत विद्यालयात शिकणाऱ्या इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या शीतल सुनील वाघमारे हिने ७५ टक्के गुण संपादन केले. तिच्या घरची हलाखीची परिस्थिती असून तिचे वडील बिगारी काम करतात तर आई कचरा वेचण्याची काम करते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कोणताही क्लास लावला नव्हता. स्वत:ची मेहनत आणि घरातील पाठिंब्यामुळे एवढे यश मिळविल्याचे शीतल वाघमारे हिने सांगितले. याचप्रमाणे आनंद सपकाळे यालाही परीक्षेत ७४ टक्के मिळाले आहे. इतर कचरावेचक महिलांची मुलेही ५० पेक्षा अधिक टक्केवारीने पास झाली आहेत. त्यांचे यापुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी मदत करावी अशी इच्छा मुलांच्या पालकांची व्यक्त केली आहे.
कचरावेचक महिलांची मुलेही अव्वल
By admin | Updated: June 18, 2014 04:05 IST