महाड (दासगाव) : दासगावमधील काळभैरवाची जत्रा सोमवारी उत्साहात पार पडली. मराठी नववर्षामध्ये महाड तालुक्यातील ही पहिलीच जत्रा असते. यावर्षी पोलादपूरची जत्रा देखील एकाच दिवशी आल्याने दासगाव जत्रेत मनोरंजनात्मक खेळणी किरकोळ आल्याने ऐन सुटीच्या काळात मुलांना आनंद लुटता आला नाही. दासगावची जत्रा सालाबादप्रमाणे मोठ्या जल्लोषात साजरी झाली. पारंपरिक पद्धतीने विविधत पूजा पार पडल्या. दासगावमधील या जत्रेत परिसरातील वहूर, केंबुर्ली, टोळ, दासगाव वांद्रकोंड आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने येतात. याचबरोबर महाड आणि परिसरातील गावातील भाविक येतात.यावर्षी प्रथमच दासगाव आणि पोलादपूरच्या जत्रा एकाच दिवशी आल्याने दासगावच्या जत्रेवर मात्र परिणाम जाणवला असला, तरी गावातील पारंपरिक पद्धतीने झालेल्या विविध कार्यक्रमांनी उत्साहात जत्रा पार पडली. गावातील पारंपरिक झालेल्या कार्यक्रमांनी जत्रेचा उत्साह द्विगुणित झाला होता. गावात आलेल्या देवाच्या काठ्या आणि पालख्यांचे स्वागत गावकऱ्यांनी खाजूबाजाच्या तालावर लेझीम खेळत जल्लोष केला. या ठिकाणी बगाड देखील फिरविण्यात आले. हे बगाड पाहण्याकरिता भाविकांनी गर्दी केली होती. रात्री बारानंतर दासगाव परिसरातील सव आणि वीर, गोठे, वामणे या गावांतील देवांच्या पालख्या आणि काठ्या आल्यानंतर भाविकांनी गर्दी केली. गावात प्रत्येक घरासमोर महिलांनी पालख्यांचे स्वागत करून पूजा के ली.रात्री १२ वाजेपर्यंत अनेक दुकानांवर किरकोळ गर्दी दिसून आली. पोलादपूरमध्ये मोठी जत्रा असल्याने या ठिकाणी खाद्यपदार्थ्यांची आणि मनोरंजनात्मक खेळणी तिकडे गेल्याने दासगावमधील दुकानांची देखील टंचाई जाणवली. ऐन सुटीच्या काळात दासगावची जत्रा येत असल्याने ही यात्रा म्हणजे शालेय मुलांकरिता देखील एक पर्वणीच असते. मात्र यावर्षी पोलादपूरची जत्रा एकाच दिवशी असल्याने या ठिकाणी केवळ एक पाळणा, छोटे चक्र अशी दोनच मोठी खेळणी आली होती. यामुळे मुलांचादेखील हिरमोड झाला. एकाच दिवशी दोन ठिकाणी जत्रांचा परिणाम दासगावच्या जत्रेवर दिसून आला.
काळभैरवाच्या जत्रेत भक्तांचा जल्लोष
By admin | Updated: April 20, 2016 02:29 IST