मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य नवीन शेट्टी यांच्यासह अनेकांविरोधात सीबीआयने गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. यात सीबीआयचेच उपाधीक्षक यू.के. मोरे आणि उद्योगपती राहुल भुमावत यांचाही समावेश आहे.
शेट्टी हे एका खासगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. गुन्हा नोंदविल्यानंतर सीबीआयने मुंबईत दहा ठिकाणांवर छापे घातले. या ठिकाणांमध्ये वरील तिघांची निवासस्थाने व कार्यालयांचा समावेश होता. या कारवाईतून आक्षेपार्ह कागदपत्रे, रोख रक्कम आणि पेनड्राइव्ह हस्तगत केले आहेत. त्याची पडताळणी करत आहेत. सीबीआयसह केंद्र शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये भ्रष्टाचार, गैरप्रकार सुरू असल्याचे सीबीआयच्या निदर्शनास आले होते. सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना हेतुपुरस्सर मदत करण्यात येत होती. (प्रतिनिधी)