दासगांव : उन्हाळी हंगाम सुरू झाला असल्याने जंगली भागातील गावठी कैरी आदिवासींनी बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरुवात झाली आहे. कैरीला मागणी असल्यामुळे दर आकाशाला भिडले होते, मात्र अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जंगल भागात कैरीची मोठ्या प्रमाणात गळ झाल्याने बाजारात कैरीची आवक वाढली आहे. यामुळे आठवडाभरापूर्वी १२५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी कैरी दर घरसल्याने केवळ ३० रुपये किलोने विकण्याची पाळी शेतकरी आणि विक्रेत्यांवर आली आहे.महाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात जंगली आंब्यांची झाडे आहेत. ही जंगल संपत्ती येथील आदिवासी कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन आहे. जंगल भागात येणारा आंबा, कैरी बाजारात विकू न हे आदिवासी आपला चरितार्थ चालवितात. अशाच प्रकारे मागील काही दिवसांपासून आंब्याच्या छोट्या छोट्या कैऱ्या आदिवासी महिलांनी विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली होती. या मोसमातील हा पहिलाच बहर असल्याने १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू होती. काही मोठे कैरी खरेदीदार देखील बाजारपेठेत कैरी खरेदी करण्याकरिता येतात. यामुळे येथील आदिवासी महिला आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून काम करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात आणून विकतात. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कैरीची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. यामुळे या कैरी विक्रेत्यांवर कमी दरात कैरी विकण्याची पाळी आली आहे.अशा प्रकारे गळ झाल्याने बाजारात कैरीची आवक झाली असली तरी याचा फटका आंब्याच्या हंंगामाला बसणार आहे. रायवळी, राती, लिटी अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या जंगली भागातील गावठी आंब्याच्या उत्पन्नाला फटका बसणार आहे. अशा प्रकारे कैरी गळल्यामुळे गावठी आंब्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
महाडमध्ये कैरीची मोठी आवक
By admin | Updated: March 8, 2016 02:00 IST