नवी मुंबई : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकला कार धडकून अपघात झाल्याची घटना तुर्भे एमआयडीसीमध्ये घडली. रस्त्यालगत अवैध पार्किंगमुळे रहदारीला अडथळा होऊन हा अपघात घडला. यामध्ये कार चालकाचे थोडक्यात प्राण वाचले आहेत.एमआयडीसी प्रशासन व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एमआयडीसी परिसरातील रहदारीचे रस्ते अवैध वाहनतळ बनले आहेत. कारवाई होत नसल्याने जागोजागी रस्त्यावर वाहने उभी करून रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने अपघात घडत आहेत. अशाच प्रकारातून सोमवारी दुपारी एचपीसीएल कंपनी समोरील मार्गावर अपघात घडला. समोर चालेल्या ट्रकला ओव्हरटेक करून कार पुढे जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. यामध्ये कारचे पूर्ण नुकसान झाले असून, थोडक्यात चालकाचे प्राण वाचले आहेत. यावेळी प्रसंगावधान दाखवत ट्रक चालकाने ट्रकवर नियंत्रण मिळवल्याने कारला धडक बसण्याचे टळले, अन्यथा चालकाच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. अपघाताची माहिती मिळताच, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी परिसरातील रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या जड अवजड वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.
तुर्भे एमआयडीसीमध्ये उभ्या ट्रकला कारची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:13 IST