नवी मुंबई : कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टाटा रुग्णालय अपुरे पडत असल्याने अशा इतरही अनेक रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सानपाडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी जैन संत पद्मसागर महाराज यांच्या कार्याचे कौतुक करत संतांच्या सान्निध्यात राहिल्याने तेज मिळत असल्याची भावना व्यक्त केली.मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये प्रतिदिन मोठ्या संख्येने कॅन्सरने पीडित असलेल्या रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार केले जातात. यामुळे देशभरातून कॅन्सरचे रुग्ण त्या ठिकाणी येतात. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यानंतरही हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून होणारे नियोजन स्तुत्य असून, त्यावर मॅनेजमेंटचा कोर्स होऊ शकतो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सानपाडा येथे व्यक्त केली. राज्यातील इतर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता मुख्यमंत्री साहाय्यता निधी सुरू करण्यात आलेला आहे. गरिबांना आरोग्यसेवेत सुविधेची व्याप्ती अधिक वाढवत नुकतीच महात्मा फुले जनाधार योजना सुरू केल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी जैन संत पद्मसागर महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. पद्मसागर महाराज यांनी लोकांना सेवेसाठी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक जण विविध क्षेत्रात समाजकार्य करत आहेत. आपल्यालाही महाराजांच्या आशीर्वादाने चांगल्या कार्याची प्रेरणा मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. संतांनी केवळ त्यागच केलेला असल्याने, त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर तेज मिळते, असे उद्गार काढत त्यांनी पद्मसागर महाराजांची प्रशंसा केली.
राज्यात कॅन्सर रुग्णालयांची आवश्यकता - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:40 IST