'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग-१अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण झाल्यामुळे मुंबईची एक आणि नवी मुंबईत एक अशा दोन धावपट्टधा (रनवे) उपलब्ध झाल्या आहेत. नवी मुंबईला काही दिवसांनी आणखी एक धावपट्टी उपलब्ध होईल. त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विमानतळावरून मुंबईला येण्यासाठी सकाळचे विमान मिळेल का? हा कळीचा प्रश्न असेल. नवी मुंबई विमानतळावरून नेमकी कोणती उड्डाणे होणार, याविषयी अजूनही स्पष्टता नसल्यामुळे सगळीकडे संभ्रमाचे वातावरण आहे.
नागपूर, औरंगाबाद यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग (चिपी), सोलापूर, अकोला, अमरावती, नांदेड, शिर्डी आणि पुणे एवढी विमानतळे चालू स्थितीत आहेत. त्याशिवाय यवतमाळ, लातूर, नाशिक, जळगाव ही विमानतळे मुंबईत येण्यासाठी योग्य वेळा उपलब्ध झाल्या तर चालू होऊ शकतात. या सर्व शहरांमधून मुंबईला सकाळच्या वेळेला येणे आणि संध्याकाळी, रात्री त्या त्या शहरात परत जाता आले तर महाराष्ट्रातले अनेक जिल्हे विमान वाहतुकीच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी राज्य शासनाने मुंबईत येणाऱ्या विमानांसाठी सकाळच्या वेळा आग्रहाने घेतल्या पाहिजेत.
मुंबईत एकच आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि क्रॉस आकाराची एकच धावपट्टी असल्यामुळे सकाळच्या वेळी विमान येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेळेची मारामार असते. आंतरराष्ट्रीय विमानांना पहाटेपासूनच्या वेळा दिल्यामुळे त्या वेळेत बदल करता येत नाही. शिवाय मुंबई विमानतळावरच कार्गो विमानांचे स्लॉटही देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतून प्रादेशिक विमान वाहतुकीला खूप मर्यादा आहेत. नवी मुंबईत दोन धावपट्ट्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत उतरून राज्यात किंवा राज्याबाहेर अन्य शहरांमध्ये जातात. त्यातील तीस ते पस्तीस टक्के प्रवासी मुंबईत उतरतात, थांबतात, असा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांचे आगमन जर नवी मुंबई विमानतळावर झाले तर तेवढे स्लॉट मुंबईत राज्यातल्या राज्यात वाहतुकीसाठी देता येतील, असे या क्षेत्रातल्या जाणकारांचे मत आहे.
उडान योजनेचा फायदा महाराष्ट्राला मिळेल का?
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधील इंदोर, भोपाळ आणि गोवा एवढा भाग विमानतळ प्राधिकरणांतर्गत पश्चिम विभागात येतो. केंद्र सरकारची उडान योजना विभागानुसार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सबसिडीदेखील देऊ केली आहे. नवे विमानतळ आणि मिळणारी सबसिडी यांना एकत्र करून राज्यांतर्गत विमान वाहतूक वाढवण्याचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या अनेक विमानतळांना त्याचा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना (एअर स्ट्रीप) धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग या उडान योजनेत घेता येऊ शकतो. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत आहे.
सकाळच्या वेळा सरकारने मागून घेतल्या पाहिजेत
१. मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे प्रवासी मुंबईत येतात आणि इथून अन्य ठिकाणी कनेक्टिंग फ्लाइट घेतात. अशा प्रवाशांना नवी मुंबईतून कनेक्टिंग फ्लाइट घेतले तर फारसा फरक पडत नाही.
२. अशी विमाने जर नवी मुंबईतून जाऊ लागली, तर त्यांच्या वेळा ही राज्यांतर्गत वाहतुकीसाठी मुंबईत उपलब्ध होतील. नवी मुंबई विमानतळासाठी जागा देण्यापासून सगळ्या गोष्टी राज्य शासनाने केल्या आहेत.
३. त्यामुळे सकाळच्या वेळा राज्यांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकारने अधिकारवाणीने मागून घेतल्या पाहिजेत, असे कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांचे मत आहे.
Web Summary : Navi Mumbai airport offers potential for increased regional connectivity. Prioritizing morning slots for state flights is crucial. Utilizing 'UDAN' scheme, connecting existing airstrips would boost Maharashtra's air travel.
Web Summary : नवी मुंबई हवाई अड्डा क्षेत्रीय कनेक्टिविटी बढ़ाने की क्षमता प्रदान करता है। राज्य की उड़ानों के लिए सुबह के स्लॉट को प्राथमिकता देना महत्वपूर्ण है। 'उड़ान' योजना का उपयोग करके, मौजूदा हवाई पट्टियों को जोड़ने से महाराष्ट्र की हवाई यात्रा को बढ़ावा मिलेगा।