नवी मुंबई : प्रचारासाठी शेवटचा रविवार असल्यामुळे नवी मुंबईसह, पनवेल, उरणमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला होता. सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक नोडमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. घरोघरी जाऊन कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत होते.
ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण मतदारसंघामध्ये रविवारी सकाळीपासून रॅली व सभांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघांमध्ये आठ लाख ४६ हजार मतदार आहेत. शहरवासी दिवसभर नोकरी, व्यावसायानिमित्त घराबाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रविवार हा एकच दिवस भेटत असतो. शेवटचा रविवार असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करा, अशा सूचना उमेदवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. कार्यकर्त्यांनी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये जाऊन पत्रके वाटण्यास सुरुवात केली होती. अनेक घरांमध्ये तीन ते चार पक्षांचे कार्यकर्ते एकाच दिवशी पोहोचल्याचेही पाहावयास मिळत होते.
राष्ट्रवादी काँगे्रसने रॅलींसह सानपाडा व ऐरोलीमध्ये अमोल मिटकरी यांच्या सभांचे आयोजन केले होते. भाजपच्या वतीने ऐरोली मतदारसंघामध्ये कोपरखैरणे गाव, प्रभाग ४६, ४७, ४५, ३७ व ३८ मध्ये उमेदवार गणेश नाईक यांनी रॅली काढली.बेलापूर मतदारसंघामध्ये मंदा म्हात्रे यांच्या नेरुळ परिसरामध्ये रॅलीचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या रॅलींमुळे नवी मुंबईमधील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले होते.
कार्यकर्ते समोरासमोररविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती, यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर येत होते. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा प्रचार करणारे अनेक जण या वेळी भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांचे काही सहकारी राष्ट्रवादीमध्ये आहेत, यामुळे गतवेळी एकाच उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले पदाधिकारी या वेळी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, असे चित्र नेरुळ, सारसोळे, सीवूडमध्ये पाहावयास मिळत होते.बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्नच्माने यांना माघार घेऊन भाजपला पाठिंबा देण्यासाठी मन वळविण्यात आले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेत्यांची त्यांच्याशी संवाद साधला असून आता माने सोमवारी नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पनवेलमध्ये ग्रामीण भागात प्रचारावर जोरपनवेल : पनवेल मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रचारावर भाजपने जोर दिला आहे. ग्रामीण भागात शेकापचा पारंपरिक मतदार असल्याने भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन केल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन रविवारी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार दौºयादरम्यान केले. भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पालीदेवद, देवद, विचुंबे, वळवली, टेंभोडे, नेवाळी, आदई असा प्रचारदौरा होता. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पनवेल विधानसभा मतदारसंघातशहरी भागात भाजपची एकहाती सत्ता आहे.
पनवेल महानगरपालिकेतभाजपचे सर्वात जास्त नगरसेवकशहरी भागातून निवडून आलेआहेत. मात्र, ग्रामीण भागातशेकापचे वर्चस्व असल्याने ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून ग्रामीण भागातही भाजपला मताधिक्य मिळवून देण्याच्या प्रयत्नाने भाजपने प्रचाराचा जोर वाढविला आहे.या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, सरचिटणीस प्रल्हाद केणी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागीझाले होते.