ठाणे : शाळकरी विद्यार्थ्याचा धक्का लागून खाली पडलेल्या लाकडी तुकड्याने शाळेचा पत्रा फुटला. त्यामुळे शाळेने त्याच्या वडिलांना शाळेत बोलवून अपमान केला. दंड म्हणून हजार रुपये भरण्यास सांगितले. वडिलांनी त्यातील ४०० रुपये भरले. उर्वरित पैसे स्वत: कमवून देण्यासाठी या १५ वर्षीय मुलाने घर सोडले. ही घटना ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनीटने उघडकीस आणली आहे. डोंबिवली राहणारा आकाश शेट्टी नववीत शिकतो. वर्गाच्या खिडकीजवळ ठेवलेला बेन्चचा तुकडा त्याचा धक्का लागू खाली पडल्याने शाळेचा पत्रा फुटला होता. शाळेने एक हजार रुपये भरपाई मागितली होती. शाळेत अपमान केल्याने उर्वरित रक्कम स्वत: भरण्यासाठी आकाशने २३ डिसेंबर रोजी घर सोडले आणि थेट मुंबई गाठली. एका हॉटेलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यान, त्याच्या पालकांनी मुलगा हरवल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्याप्रकरणी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन आणि रामनगर पोलिसांनी समांतर तपास सुरू करताच, आकाश डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद्य झाल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी मुंबईत शोध सुरू केला असता, तो एका हॉटेलमध्ये काम करताना दिसला. त्याला पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली. (प्रतिनिधी)
दंड भरण्यासाठी मुलाने घर सोडले
By admin | Updated: January 7, 2015 02:03 IST