कळंबोली: गेली कित्येक महिन्यांपासून कामोठेवासीयांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. याविरोधात बुधवारी भाजपा व आरपीआयने वेगवेगळा मोर्चा काढला. त्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे दाखल केले असून, दोन जणांना अटक केली आहे.कामोठेची लोकवस्ती झपाट्याने वाढत चालली असून त्यानुसार एकूण ४२ एमएलडी पाण्याची मागणी आहे. मात्र आजच्या घडीला फक्त २४ एमएलडी पाणी वसाहतीला मिळत असून त्यामध्ये कपात केली जात आहे. कामोठे वसाहतीकरिता सिडको नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाणी विकत घेते. मोरबे पाणीपुरवठा योजनेतून पाणीकपात केली आहे, त्यामुळे सिडकोकडे कोणताही पर्याय नाही. प्रश्ना संदर्भात सिडकोकडे वारंवार बैठका घेण्यात आल्या. त्याचबरोबर मोर्चा, आंदोलने केली , मात्र हा प्रश्न निकाली निघाला नाही. कामोठे वसाहतीत पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत बुधवारी आरपीआयने मंगेश धिवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. शिष्टमंडळाने सेक्टर ६ येथील सिडको कार्यालयात जावून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर भाजपाच्या वतीने सिडकोवर धडक देण्यात आली. पोलिसांनी बाहेर मोर्चा अडवला. परंतु भाजपाचे पदाधिकारी निवेदन देण्याकरिता पोलिसांच्या सहमतीने आतमध्ये गेले. त्यावेळी आपले म्हणणे मांडत असताना भाजपाचे महेंद्र भोपी आणि हॅप्पीसिंग यांनी कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे यांच्या अंगावर शाई उडवली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
पाण्यासाठी भाजपाचा सिडकोवर मोर्चा
By admin | Updated: December 10, 2015 01:58 IST